मालवण : भविष्यात पाणीटंचाई उद्भवू नये या उद्देशाने मालवण पंचायत समितीने बंधाऱ्यांपाठोपाठ शेततळी खोदण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१५- १६ या आर्थिक वर्षात तालुक्यात १०० शेततळी खोदण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याकरिता सुमारे ७० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी शेततळी योजना फायदेशीर ठरणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली. या योजनेत अनुसूचित जाती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, भू- सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कृषी कर्ज योजना सन २००८ नुसार अल्पभूधारक, अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत अन्य निवास अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्तींना या शेततळी योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन पराडकर यांनी केले आहे. योजनांची वाटचाल पूर्णत्वाकडेमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत तालुक्याला यावर्षी ३ कोटी २५ लाखांचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी १ कोटी ५५ लाख रुपये विविध योजनांमध्ये खर्च केले आहेत. यामध्ये २७९ सिंचन विहिरींपैकी १०८ पूर्ण झाल्या असून १३५ विहिरींचे कामे सुरू आहेत. ५०० शौचालयांपैकी ३७९ शौचालयांना मंजुरी दिली. त्यांचे काम सुरू आहे. २१२ गांडूळ खत युनिट पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत ३२६ हेक्टर क्षेत्रात वृक्ष लागवड झाली असून सर्व योजना आता पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे गटविकास अधिकारी पराडकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)असे असणार शेततळ्याचे स्वरूपशेततळी बांधण्यासाठी १० बाय १० मीटर लांबी आणि ३ मीटर खोली या माती भागातील अंतरासाठी १५ हजार ४०० रुपये, डोंगराळ भागासाठी १७ हजार ४०० रुपये अनुदान, तर ३० बाय ३० मीटर लांबी आणि ३ मीटर माती भागातील खोलीसाठी १ लाख ३४ हजार आणि डोंगराळ भागासाठी १ लाख ४८ हजार रुपये लाभार्थ्यांना मिळणार आहेत. या योजनेसाठी ८० टक्के मजुरी आणि २० टक्के यांत्रिकीकरण गृहीत धरण्यात आले आहे. वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी ही योजना आहे. मजुरांकरवी या शेततळ्या खोदावयाचे आदेश असल्याचे पराडकर यांनी स्पष्ट केले.
मालवण पं. स. ने हाती घेतला शेततळी उपक्रम
By admin | Published: November 29, 2015 9:23 PM