मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर धुडगूस घालत असलेल्या परराज्यातील पर्ससीन व हायस्पीड ट्रॉलर्ससह जिल्ह्यातील विनापरवाना मिनिपर्ससीनच्या विरोधात युवा मच्छिमार अन्वय प्रभू यांनी सोमवारी मालवण समुद्रात सात वाव अंतरात (चार किलोमीटर आतमध्ये) बोटीत बसून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. सायंकाळी ४ वाजता सुरु केलेल्या या आंदोलनाला स्थानिक मच्छिमार व महिला मच्छिमारांनीही पाठींबा दिला आहे. मुख्यमंत्री, मत्स्योद्योगमंत्री यांच्या लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर शेकडो पर्ससीनचा धुमाकूळ सुरु असताना चार पर्ससीन बोटींव्यतिरिक्त अन्य कोणावरही कारवाई झालेली नाही. छोट्या मच्छिमारांच्या हाता तोंडाशी आलेला घास हे ट्रॉलर्र्स अतिक्रमण करून हिरावून नेत आहेत. मत्स्य विभाग कारवाई करण्यात अपयशी ठरतोे. यामुळे त्यामुळे छोट्या मच्छिमारांच्या न्याय्य हक्कासाठी आपण भर समुद्रात १ आॅक्टोबरपासून केव्हाही उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मालवण दांडी येथील युवा मच्छिमार अन्वय प्रभू यांनी दिला होता. त्यानंतरही मत्स्य विभाग कारवाई करण्यास अपयशी ठरल्याने सोमवारी दुपारी प्रभू यांनी उपोषण करण्याचा पवित्रा घेतला. (प्रतिनिधी)
पर्ससीन विरोधात मालवण समुद्रात उपोषण
By admin | Published: October 06, 2015 12:11 AM