मालवण : मालवण शहराला ऐतिहासिक व शिवकालीन वारसा लाभलेला आहे. मालवणनगरीचा आगामी काळात सर्वांगीण विकास करताना संस्कृतीही टिकवून ठेवली जाणार आहे. वाढते पर्यटन लक्षात घेता युती शासनाच्या माध्यमातून शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असून, शहर सुरक्षित होईल. नगरोत्थान, भूमिगत वीज वाहिन्या, आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदर जेटी, किल्ला सुशोभीकरण, आदी महत्त्वाकांक्षी उपक्रमांतून मालवण शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविणार, असा विशास गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. मालवण पालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मंत्री केसरकर शनिवारी सायंकाळी मालवण दौऱ्यावर होते. यावेळी हॉटेल चिवला येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार वैभव नाईक, भाजपचे संदेश पारकर, बाबा मोंडकर, राजन वराडकर, बबन शिंदे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश कांदळगावकर, नितीन वाळके, हरी खोबरेकर उपस्थित होते. शहराची पर्यटनदृष्ट्या वाटचाल करीत असताना प्रलंबित समस्या मार्गी लावणार आहे. स्थानिक आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत तसेच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून आणि मार्गदर्शनातून विकास केला जात आहे. शहराच्या विकासाला खीळ बसविणारा ‘सीआरझेड’ कायद्यात शिथिलता, वाहतूक कोंडी समस्या, किनारपट्टी भागासाठी तिलारी प्रकल्पातून पाणी पुरवठा, पर्यटन सुविधा केंद्र, खाडीपत्रात बोटिंग सुविधा, आदी समस्या मार्गी लावताना अपेक्षित विकास करण्यासाठी युती शासन कटिबद्ध असल्याचे केसरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी) पोलिसांवर कारवाई नाही गोव्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा शांत व सुसंस्कृत बनवायचा आहे. जिल्हा भयमुक्त व गुन्हेगारीमुक्त करण्याच्या दृष्टीने अवैध धंदे नष्ट करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्यास त्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. मात्र,त्या पोलिसांची खात्यांतर्गत तत्काळ चौकशी करून निर्दोष असल्यास त्यांना त्याच पोलिस ठाण्यात पुन्हा नियुक्ती दिली जाईल. पोलिस खात्यात कोणावरही नाहक कारवाई केली जाणार नसल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. महेश कांदळगावकर अनुभवी उमेदवार युतीचे शिवसेना उमेदवार महेश कांदळगावकर हे नगरपालिका प्रशासनातील अनुभवी आहेत. कांदळगावकर हे नगराध्यक्ष पदाला न्याय देऊन शहराच्या विकासाला गती देतील. भाजपचे पदाधिकारी रविकिरण तोरसकर हे तरुण कार्यकर्ते आहेत. त्यांनी कांदळगावकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर मी बोलणे चुकीचे असून, तोरसकर हे नक्कीच पक्षशिस्त पाळून युतीच्या उमेदवारांना सहकार्य करतील, असाही तोरसकर यांचा मार्मिक समाचार मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला. जागा निश्चितीसाठी मोजणी वायंगणी-तोंडवळी येथे उद्या, मंगळवारी होणारी भू-मोजणी जमीन लाटण्यासाठी नसून प्रकल्प जागा निश्चितीसाठी आहे. ग्रामस्थांच्या खासगी जागा असल्याने वाटाघाटीने ते संपादित करताना शासनाकडून अधिक मोबदला दिला जाणार आहे. भू-मोजणी ही एक शासनाची प्रक्रिया आहे. त्यामुळे या भू-मोजणीला ग्रामस्थांनी विरोध न करता सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
मालवण आंतरराष्ट्रीय शहर बनविणार
By admin | Published: November 14, 2016 12:44 AM