वैभववाडी : अवैध नामनिर्देशन पत्राबाबत जिल्हा सत्र न्यायालयात अपिल केले आहे, त्याचा निर्णय १६ रोजी लागेल. परंतु, वाभवे-वैभववाडीच्या सतराच्या सतरा जागा जिंकण्याचा आमचा मानस असून, विकास आघाडीचे लोक कोणाचे बाजूने आहेत, हे योग्य वेळेस तेच सांगतील, असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.आमदार राणे यांनी येथील संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप रावराणे, उपसभापती शोभा पांचाळ, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, बंड्या मांजरेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार राणे पुढे म्हणाले की, शिवसेना सत्तेसाठी बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. तसे झाल्यास राज्यातील सरकार कोसळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास वैभववाडीच्या विकासासाठी इतका निधी आणू, असा विकास करू असे सांगणाऱ्यांचे काय होणार? ज्या सरकारमध्ये एकवाक्यता आणि समन्वय नाही, ते जनतेला न्याय देऊ शकतात का? याचा विचार येथील मतदार निश्चितपणे करतील. जिल्हा शिवसेनेत अंतर्गत भांडणे आहेत. पालकमंत्री व कुडाळचे आमदार यांचे पटत नाही. ते निधी कसा आणणार? असा सवाल आमदार राणे यांनी यावेळी केला.ते पुढे म्हणाले, आघाडी व्हावी अशी आमची इच्छा आहे. राष्ट्रवादीला चार जागा देण्याचे आम्ही मान्य केले असून, त्या जागा कोणत्या याची यादीही आम्ही त्यांना दिली आहे. आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत. लवकरच त्यांच्याकडून याबाबत उत्तर येईल. त्यांच्याकडून निर्णय आल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करत आघाडीचा चेंडू आमदार राणे यांनी राष्ट्रवादीच्या कोर्टात ढकलला आहे. (प्रतिनिधी)गरज वाटल्यास सभाआपण स्वत: प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणार आहोत. त्यातूनही गरज वाटलीच तर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे व राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची एक सभा प्रचाराच्या अंतिम टप्प्यात घेतली जाईल, असे स्पष्ट करत आपण दोन नोव्हेंबरपर्यंत वैभववाडीकरच आहोत असेही सांगितले.शिवसेना सत्तेसाठी बाहेर पडण्याच्या मार्गावर.राज्यातील सरकार कोसळण्याची शक्यता.वैभववाडीच्या विकासासाठी निधी आणणाऱ्यांचे पुढे काय होणार? राणे यांचा प्रश्न.विकासाच्या गप्पा करणारे जनतेला आता न्याय देऊ शकतील? नितेश राणे यांचा सवाल.
सतराही जागा जिंकण्याचाच मानस
By admin | Published: October 14, 2015 11:34 PM