मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीची आगामी निवडणूक भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर यांनी मंडणगड येथे नुकतीच केली.मंडणगड येथे नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतरा प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे यांच्यासमवेत मंडणगडचा दौरा केला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर पार्टीच्यावतीने येथील जनकल्याण पतसंस्थेत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तालुकाध्यक्ष सचिन थोरे, जिल्हा कार्यकरिणी सदस्य अशोक गोविलकर, विश्वदास लोखंडे, राजू पड्यााळ, अनंत सावंत उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्षांनी आगामी निवडणुकीसंर्दभातील पक्षाची भूमिका स्पष्ट केली. भाजप सदस्य नोंदणी अभियानात तालुक्यात तीन हजारांहून अधिक नागरिकांनी पक्षाची सदस्य नोंदणी केली आहे. केवळ शहरात सहाशे नागरिकांनी सदस्य नोदंणी केली आहे. शहरात तीनेशहून अधिक नागरिकांनी संकेतस्थळावरुन सदस्यनोंदणी केली असल्याने पक्ष वाढीसाठी व नगरपंचायतीकरिता सकारात्मक वातावरण असल्याने चांगल्या निवडणूक निकालांची अपेक्षा व्यक्त केली.त्यानुसार मंडणगड नगरपंचायत निवडणुकांचा सामना करताना स्वबळावर संपूर्ण सतरा प्रभागात उमेदवार चाचपणी, आरक्षणानुसार उमदेवारीचे जातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्रे यांची पूर्तता आगामी पंधरवड्यात करण्यात येणार आहे. राज्यात भाजपची सत्ता आहे याशिवाय नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यामुळे नगरपंचायतीची सत्ता भाजपच्या हाती दिल्यास नगरविकास खात्याच्या शहर विकासाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविणे सहज शक्य होणार आहे, असे ते म्हणाले.शहरातील संभाव्य विकासकामे लक्षात घेऊन मंडणगड शहरातील विविध विकासकामांसाठी खासदार अमर साबळे यांच्या खासदार निधीच्या माध्यमातून निवडणुक आचारसंहिता लागण्यापुर्वी २५ लाखांच्या निधीची विकासकामे सुरु करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले़ भारतीय जनता पार्टी लवकरच तालुक्यात स्वत:चे कार्यालय सुरू करणार आहे. यासाठी प्रकाश मेहता, खासदार अमर साबळे यांचा मंडणगड दौरा होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. (प्रतिनिधी)
मंडणगड नगरपंचायत भाजप स्वबळावर लढणार
By admin | Published: September 21, 2015 9:53 PM