वेंगुर्ला : पौष अमावास्येला होणाऱ्या महोदय पर्वणीचे औचित्य साधून गावोगावचे ग्रामदैवत आणि तरंगदेवता आपल्या लवाजम्यासह येणार असल्याने वेंगुर्ला-सागरेश्वर तीर्थक्षेत्रावर अलोट गर्दी उसळणार आहे. आपल्या देवतांसह भाविक या तीर्थस्नान करणार आहेत. बाहेरून गावातील येणारी ग्रामदैवत ही शहरातील तसेच गावातील काही मंदिरे आणि काहींच्या निवासस्थानांमध्ये राहणार आहेत. त्यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
पौष अमावास्या व श्रवण नक्षत्र एकत्र आल्यास महोदय पर्वणीचा योग येतो. यावर्षी असा योग आल्याने ९ फेब्रुवारी रोजी गावोगावच्या ग्रामदैवतांसह भाविक तीर्थस्नान करणार आहेत. महोदय पर्व सकाळी ८ वाजून २ मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत असल्याने या कालावधीत तीर्थस्नान करता येणार आहे. यापूर्वी ८ फेब्रुवारी २०१६ त्यानंतर ४ फेब्रुवारी २०१९ साली महोदय पर्वणीचा योग आला होता. वेंगुर्ला तालुक्यातील श्री तीर्थक्षेत्र सागरेश्वर व आरवली समुद्रकिनारी पंचक्रोशीतील देवस्थाने तरंगदेवता व पालख्यांसह तीर्थस्नानासाठी येत असतात.
तीर्थस्नानाला येण्यापूर्वी त्या-त्या गावांतील मानकरी, गावकर मंडळी, देवस्थान विश्वस्त आपल्या ग्रामदेवतेचा कौलप्रसाद घेतात. जर हा कौलप्रसाद झाला, तरच भक्तमंडळी आपल्या ग्रामदेवतेसह तीर्थस्नानास येतात. यावर्षी मिळालेल्या कौलप्रसादानुसार वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, श्री देवी सातेरी, श्री देव पूर्वस व तरंगदेवता तीर्थस्नानासाठी जाणार आहेत.
तसेच आंबडपाल, मांडकुली, वाडोस, बांबुळी, पुळास आदी ठिकाणची ग्रामदैवत आपल्या भक्तांसमवेत तीर्थस्नानासाठी येणार आहेत. त्यामुळे शुक्रवारी वेंगुर्ला शहर व सागरेश्वर परिसरात विविध ठिकाणच्या ग्रामदैवतांचे दर्शन घडणार असल्याने भाविकही मोठ्या प्रमाणावर दाखल होणार आहेत. काही ठिकाणी मुंबई, पुणेस्थित चाकरमानीही या तीर्थस्नानासाठी येणार आहेत.