ओरोस: महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखांवरील कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी. तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी मिळावी. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन गुरुवारी उपजिल्हाधिकारी जयकृष्ण फड यांच्याकडे सादर केले.शेतकऱ्यांमध्ये संताप!
- सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तसेच धरणे आंदोलन, मोर्चा काढून त्यांचे लक्ष वेधले. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेलेली नाही.
- कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या व मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. केवळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
- त्यामुळे जिल्ह्यातील कर्जबाजारी आंबा बागायतदार शेतकरी एकवटले असून त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आमच्या मागण्यांबाबत तात्काळ निर्णय जाहीर करावा, अन्यथा १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा दिला आहे.
या निवेदनावर श्यामसुंदर राय, महादेव गावडे, नारायण गावडे, विठ्ठल घोगे, राजन होडावडेकर उदय गावडे, सुरेश गावकर आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत .