कणकवली, देवगड : विजयदुर्ग व देवगड परिसरातील बागायतदारांचा आंबाएसटीच्या माध्यमातून कोल्हापूर, मलकापूर येथे रवाना झाला आहे. एसटीच्या या वाहतुकीला चांगला प्रतिसाद लाभत आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे एसटी वाहतूक ठप्प झाली होती. त्याचप्रमाणे आंबा वाहतुकीवरदेखील परिणाम झाला होता. तसेच अनेक अडथळे निर्माण झाले होते. या बाबींचा विचार करून परिवहन मंत्री व राज्य परिवहन मंडळाने ट्रक, बस अशी वाहने आंबा व मालवाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या.
याबाबत इंटकचे विभागीय अध्यक्ष अशोक राणे यांनी विजयदुर्ग व देवगड परिसरातील त्यांच्या परिचित असलेल्या आंबा बागायतदार, शेतकरी व व्यावसायिक यांच्याशी संपर्क साधला. तसेच एसटीच्या या उपक्रमाबाबत त्यांना माहिती दिली.राज्य परिवहन महामंडळाची वाहने भाड्याने घेण्याबाबत त्यांना त्यांनी आवाहन केले. त्यांच्या या प्रयत्नाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या उपक्रमाचा लाभ अन्य आंबा शेतकरी, बागायतदार व व्यावसायिक यांनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे विजयदुर्ग आगाराचे अध्यक्ष महेश बिडये, सचिव दत्ता पाताडे, कार्याध्यक्ष पी. वाय. मिठबावकर यांनी केले आहे. उत्पन्न वाढीसाठी असेच प्रयत्न करण्यात यावेत. यासाठी लागणारे सहकार्य इंटक संघटनेच्यावतीने करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.२५0 पेट्या घेऊन बस बुलढाण्याकडे रवानाकोल्हापूर, बुलढाणा (मलकापूर) येथे जाणाऱ्या आंबा पेट्यांसाठी आंबा उत्पादक शेतकरी, बागायतदार यांनी एसटीच्या विविध वाहनांबाबत इच्छुकता दर्शविली. याबाबत ग्रेसीस फर्नांडिस यांनीही विशेष प्रयत्न केले. त्यानुसार एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ व विभागीय वाहतूक अधिकारी अभिजीत पाटील यांनी मार्गदर्शन व नियोजन करून वाहने उपलब्ध करुन दिली. त्याचप्रमाणे विजयदुर्ग आगाराचे प्रमुख सचिन डोंगरे यांनीही आगारातील बस तातडीने उपलब्ध करून दिली. त्यामधुन २५० आंब्याच्या पेट्या घेऊन कोल्हापूर, बुलढाणा (मलकापूर)कडे बस रवाना झाली.