वेंगुर्ले : गेले आठ दिवस वाढलेल्या प्रचंड उष्म्यामुळे उष्माघात होऊन आंब्यांच्या देठातील डिंक सुकून आंबे जमिनीवर पडून आंब्यांमध्ये लासे होण्याचे प्रकार जिल्ह्यात ठिकठिकाणी घडले आहेत.यामुळे आंबा बागायतदार व शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले असून अद्यापपर्यंत याची दखल प्रशासन, कृषी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी घेतली नसल्याने याबाबत वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रफुल्लचंद्र परब यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.या हंगामात सुरुवातीलाच काही ठिकाणी आंब्याचे उत्पादन कमी असून आता गेले काही दिवस वाढलेल्या प्रचंड उष्म्यामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.एका झाडावर असलेल्या आंब्यांच्या ३० ते ४० टक्के आंबे या उष्माघातामुळे खाली पडून नुकसान झाले आहे. या आंब्यांना कैरी विक्रेत्यांनीही घेण्यासाठी नकार दिल्यामुळे हे आंबे अक्षरश: फेकून देण्याची वेळ बागायतदारांवर आली आहे. असा प्रकार घडूनही प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याने बागायतदारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तसेच आंबा बागायतदार शेतकऱ्यांकडून १२ हजार व केंद्र शासनाने १२ हजार असा एकूण २४ हजारांचा विमा काढला असून हे पैसे या विमा कंपन्यांच्या घशात घालण्यासाठी आहेत काय? असा सवालही परब यांनी केला आहे.शासनाने दखल घेण्याची मागणीया प्रकारामुळे आंबे कुसण्याचे प्रकार घडत असल्याने मुंबई बाजारपेठेत जोपर्यंत कॅनिंग सुरू होत नाही तोपर्यंत आंबे घेण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिल्याचेही परब यांनी सांगितले आहे. तरी शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन कृषी विभागाने संपूर्ण जिल्ह्याचा सर्व्हे करावा व नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी, अशी मागणीही परब यांनी केली आहे.