शिवाजी गोरे - दापोली -काजू बोंडापासून वाईन तयार करण्याचे संशोधन यशस्वी केलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने करवंद, जांभूळ, आंबा, वाईनचा प्रयोगही यशस्वी केला आहे. आता कोकणातील रातांब्यापासून वाईन बनविण्याचा प्रयत्न विद्यापीठ स्तरावर सुरु आहे. रातांब्यापासून वाईन तयार करण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यास (कोकम) रातांब्याची मागणी वाढेल आणि आंबा, काजूपाठोपाठ रातांब्याचे महत्त्वही वाढेल.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृ षी विद्यापीठ, दापोली शिक्षण, विस्तार, संशोधन कार्यात अग्रगण्य स्थानी असणारी संस्था आहे. राज्यातील अन्य कृषी विद्यापीठांच्या तुलनेत दापोली कृ षी विद्यापीठ नंबर एकचे विद्यापीठ आहे. सुरुवातीच्या काळात संशोधन करताना शास्त्रज्ञांना खूप अडचणी येत होत्या. यापूर्वीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अपार कष्टाचे रिझल्ट आता दिसायला लागले आहेत. आंबा, काजू, नारळ, भात, मसाला पिके, चिकू, करवंद, जांभूळ या पिकांवर संशोधन न थांबता शेतकऱ्याच्या गरजा व कमी कालावधीत कमी जागेत अधिक उत्पन्न कसे घेता येईल, यासाठी विद्यापीठाने प्रयत्न सुरु ठेवले आहेत. कोकणातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने भातपीक घेत होता. या भाताच्या सुधारित जातीमुळे कोकणातील भातपिकाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.कोकणातील शेतकरी केवळ पारंपरिक भातपिकावर समाधान मानत होता. कृषी विद्यापीठाने भाताच्या रत्नागिरी, रत्ना, कर्जत या जातीचा शोध लावला. या जातीकडे शेतकरी वळू लागला. परंतु यामध्ये काही बदल अपेक्षित होते. त्यामुळे यावर संशोधन करुन रत्ना जातीला पर्याय म्हणून कर्जत - २ प्रसारित करण्यात आली. कर्जत - २ ही जात संपूर्ण कोकणात लोकप्रिय ठरली. रत्नागिरी जिल्ह्यात कर्जत - २ ला चांगली पसंती आहे. रायगड जिल्ह्यात जया या जातीला मागणी आहे. ठाणे जिल्ह्यात कर्जत - ३ या भाताच्या जातीला मागणी आहे. सिंधुदुर्गात हायब्रीडला जास्त मागणी आहे. सुरुवातीच्या काळात भाताच्या टपोऱ्या दाण्याच्या जाती होत्या. त्यानंतर लांब बारीक जातीचे संशोधन करण्यात आले. आता आखूड बारीक दाण्याच्या जातीला मार्केटमध्ये जास्त मागणी आहे. त्यामुळे कर्जत ८ व कर्जत ९ या जातीचे संशोधन करुन सुधारित वाण तयार करण्यात आले. बारीक जिराराईससारख्या या वाणाला अधिक पसंती आहे. रत्नागिरी-२.४, कर्जत ३, ७ या हळव्या जाती अधिक लोकप्रिय आहेत. सुधारित जातीमुळे हेक्टरी ३० ते ५० क्विंटल भात उत्पन्न मिळू शकते. आंबा, काजू हे कोकणातील कॅशक्रॉप आहे. आंब्यातील गुणदोष कमी करण्यासाठी हापूसला पर्याय रत्ना, केशर, नीलम दरवर्षी येणाऱ्या साकाविरहीत जाती विद्यापीठाने शोधून काढल्या. हापूसला पर्याय कोकण सम्राट जातीचा शोध लावला. कोकणातील हापूस आंब्याला तोड नाही. हापूस आंब्यावर प्रक्रिया करुन त्यापासून आमरस, आंबा पोळी बनविली जाते. त्याच धर्तीवर रत्ना, केशर, लिली, सिंधू, मल्लिका अशा ३० ते ३५ जातीवर अजूनही प्रक्रिया झालेली नाही. केवळ हापूसवर प्रक्रिया योग्य आहेत का? कोणत्या जातीवरील प्रक्रिया अधिक चांगल्या आहेत, यावर संशोधन सुरु आहे. हे परिणाम चांगले आल्यास या जातीलासुद्धा हापूसप्रमाणे मागणी वाढणार आहे.काजूच्या बोंडापासून वाईन व सिरप बनविण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. असे असले तरी कोणत्या काजूच्या जातीच्या बोंडात जास्त रस आहे, कोणते बोंड प्रक्रिया योग्य आहे, हे समजण्यासाठी काजूप्रमाणेच बोंडावर प्रक्रिया करण्यात येत असून, शेतकऱ्याला चांगला परिणाम मिळण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत.नारळावरही शास्त्रज्ञांचे संशोधन सुरु आहे. यापूर्वी उंचच्या उंच व १० ते १२ वर्षांनी येणाऱ्या झाडावर संशोधन करुन ४ ते ५ वर्षात नारळाचे पीक कसे घेता येईल, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सिंगापुरी व आॅरेंज डॉग या बुटक्या जातीच्या नारळाच्या झाडाप्रमाणेच अजून एक दोन प्रकारच्या जाती विकसित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. नारळाची टीडी जातीलाही फार मोठी मागणी आहे.शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन विद्यापीठ शास्त्रज्ञ विविध संशोधनातून सुधारित जाती विकसित करीत आहेत. विद्यापीठाने प्रसारित केलेल्या भाताच्या ६० टक्के जाती शेतकरी वापरु लागला आहे. अजून काही शेतकरी बाहेरचे बियाणे किंवा जुनेच बियाणे वापरत आहेत. काही शेतकरी सुधारित बियाणे व सुधारित तंत्रज्ञान वापरून प्रगती करीत आहेत. परंतु काही शेतकरी जुने सोडायला तयार नाहीत. पुढील काही वर्षात यात बदल होईल. विद्यापीठ स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. भविष्यात कोकणातील शेतकऱ्याला विद्यापीठाच्या संशोधनाने चांगले दिवस येतील.- डॉ. उत्तमकुमार महाडकर, संशोधन संचालक, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
आंबा, काजूपाठोपाठ आता संशोधन रातांब्यापासून वाईननिर्मितीचे!
By admin | Published: June 30, 2015 11:35 PM