कणकवली : कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची रायगड जिल्ह्यातील उरण नगरपरिषद मुख्याधिकारीपदी बदली झाली आहे. कणकवली मुख्याधिकारीपदी मनोज उकिर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मनोज उकिर्डे हे पनवेल महानगरपालिकेत सहआयुक्तपदी कार्यरत होते. त्यांची बदली कणकवली येथे करण्यात आली आहे. ते गुरुवारी कणकवली नगरपंचायत कार्यालयात रुजू होणार आहेत.मुख्याधिकारीपदी कार्यरत असलेल्या अवधूत तावडे यांनी कणकवली नगरपंचायतचा कारभार यशस्वीरीत्या सांभाळला होता. जनहिताचे अनेक प्रश्न स्वतः पुढाकार घेऊन सोडविण्याचे प्रयत्न त्यांनी केले होते.डिसेंबर २०१४ पासून ते कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारीपदी कार्यरत होते. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत योग्य नियोजन करून लोकसहभागातून चांगली स्वच्छता मोहीम त्यांनी कणकवली शहरात राबविली होती.
त्याचप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कणकवली शहराचे नाव देशपातळीवर पोचविण्यासाठी अवधूत तावडे यांनी पुढाकार घेतला होता. ते उरण येथे नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी बुधवारी कणकवली येथून रवाना झाले.तत्पूर्वी कणकवली नगरपंचायतीच्यावतीने त्याना निरोप देण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक तसेच नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.