सिंधुदुर्गनगरी : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सुरू असलेल्या जोरदार पावसाने सिंधुदुर्गात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ओसरगाव येथे महामार्गावर विजेच्या तारा कोसळल्याने वाहतूक अर्धा तास खोळंबली होती. जिल्ह्यातील बहुतांशी पूल पाण्याखाली गेल्याने शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. माणगाव खोरे आणि तळवडे भागात पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. काही माध्यमिक शाळाही लवकर सोडण्यात आल्या. मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल ते कणकवली या दरम्यान मोठे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ओसरगाव पटेलवाडी येथे दुचाकी त्यात उतरली आणि अपघात झाला. दुचाकीस्वार फरफटत जाऊन रस्त्यालगतच्या गटारात कोसळला. त्याला गंभीर जखमाही झाल्या. महामार्गावरील ओसरगाव येथे रस्त्यावर तारा कोसळल्याने वाहतूक अर्धा तास खोळंबली होती. वितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या तारा बाजूला केल्या आणि महामार्ग वाहतुकीस खुला केला. वैभववाडी तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने तिथवली-दिगशी येथे गोठा तर खांबाळे येथील भैरीच्या ालावाची संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले आहे. घाटमार्गावर दरडींची पडझड झाली. मात्र, या पडझडीचा वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-हेदूलवाडी येथील उदय नाईक यांच्या घराशेजारी इमारतीवर पिंपळाच्या झाडाची फांदी छपरावर पडून पत्रा तुटल्याने ११ हजाराचे नुकसान झाले. तलाठी गिरप यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. तळवडे-नेमळे-कुडाळमार्गे जाणाऱ्या तळवडे-खेरवाडी पुलावर पाणी आल्याने सकाळी वाहतूक बंद झाली. यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची कुचंबणा झाली. त्यामुळे यामार्गे जाणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठा फटका बसला. माणगाव परिसरात ठिकठिकाणी भातशेतीत पाणी शिरल्याने पोटरीला भरून आलेले व आकडी वळलेले भात या पावसामुळे जमिनीला मिळाले. त्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले. वायरी गर्देरोड येथे माड कोसळून नुकसान पावसामुळे मालवण- वायरी गर्देरोड येथे दिलीप सादये यांचा नारळाचे झाड (माड) कोसळल्याने मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. या पडझडीत वीज वितरणचे नुकसान झाले आहे. हा माड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूकडील शाम तळाशीलकर यांच्या दगडी कुंपणावर पडल्याने कुंपणाचे काही अंशी नुकसान झाले. स्थानिकांच्या मदतीने हा माड बाजूला करण्यात आला. मात्र वीजवाहिन्या तुटल्याने या भागातील वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. रेल्वे सेवेवर परिणाम मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांना शुक्रवारी विलंब झाला. गोव्याच्या दिशेने जाणारी मांडवी एक्सप्रेस ६ तास ४० मिनीटांनी विलंबाने धावली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. या शिवाय अन्य गाड्याही साधारपणे अर्धा ते दीड तास उशिराने धावल्या. तिलारी नदीचे पाणी घुसले भातशेतीत दोडामार्ग तालुक्यातील तिलारी, आयी, मुळस, कळणे, भेडशी येथील नद्यांंना पूर आल्याने ठिकठिकाणचे कॉजवे पाण्याखाली गेले होते. त्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली. एस.टी. महामंडळाच्या गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. तिलारी नदीच्या आलेल्या पुराचे पाणी नदीकाठालगतच्या बागायतींमध्ये घुसल्याने शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्गात अनेक पूल पाण्याखाली
By admin | Published: September 23, 2016 11:19 PM