सिंधुदुर्गनगरी : कोपर्डी अत्याचाराचा निषेध, आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्यात, यासाठी २३ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाजातील तीन लाख बांधवांचा मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जिल्हा नियोजन बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, माजी आमदार पुष्पसेन सावंत, जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी यांच्यासह एक हजार जणांची उपस्थिती होती. ‘ना कोणत्या पक्षाचा, ना कोणत्या संघटनेचा, एक मराठा लाख मराठा’ या घोषणांनी येथील शरद कृषी भवनातील सभागृह दणाणून सोडले. कोपर्डी घटनेनंतर राज्यात मोर्चाची मालिका सुरू झाली आहे. हा मोर्चा सिंधुदुर्गात कधी निघणार, याबाबत जिल्ह्याला उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर रविवारी येथील शरद कृषी भवन येथे मराठा क्रांती मोर्चा नियोजनाच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. पाऊस असतानाही मोठ्या प्रमाणात मराठा बांधव बैठकीला उपस्थित होते.
ओरोस येथे मराठा बांधवांचा २३ आॅक्टोबरला ‘एल्गार’
By admin | Published: September 25, 2016 11:22 PM