कणकवली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात बंद आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला होता.कणकवलीतही आक्रमक झालेल्या आंदोलकांनी जानवली तसेच गडनदी पुलासह इतर ठिकाणी टायर पेटवून मुंबई-गोवा महामार्ग रोखला. तसेच काही ठिकाणी झाडे तोडून महामार्ग रोखण्यात आला. बंदच्या निमित्ताने गुरुवारी कणकवलीत आरक्षणासाठी मराठा समाजाने एकप्रकारे एल्गारच पुकारला होता.कणकवली बाजारपेठ बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. तर आंदोलकांनी गनिमी काव्याचा अवलंब करीत तालुक्यात ठिकठिकाणी महामार्ग रोखला. मात्र, आंदोलनाला हिंसक वळण लागू दिले नाही.जानवली पुलावर आंदोलकांनी टायर पेटवून महामार्ग रोखला. याबाबत माहिती समजताच घटनास्थळी पोलीस तत्काळ दाखल झाले. पण टायरनी चांगलाच पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे पोलीस हतबल झाले होते. आंदोलकांच्या या कृतीमुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.मराठा समाजाच्या या आंदोलनामुळे कणकवली शहर पूर्णत: ठप्प झाले होते. बाजारपेठेत शुकशुकाट होता. रिक्षा, टेम्पो वाहतूकही बंद होती. त्याचप्रमाणे बंदच्या पार्श्वभूमीवर मोठे नुकसान टाळण्यासाठी एसटी सेवाही बंद ठेवण्यात आली होती.बेळणे येथे दगड रचून आंदोलकांनी महामार्ग ठप्प केला होता. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दगड हटविले व महामार्ग मोकळा केला. खारेपाटण, तळेरे आदी तालुक्यांतील भागातही रास्ता रोको करण्यात आला. तालुक्यातील काही शाळांनी बंदच्या पार्श्वभूमीवर अगोदरच सुटी जाहीर केली होती. तर काही शाळा लवकर सोडण्यात आल्या. महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली होती. या बंदचा जनजीवनावर परिणाम झाला.यावेळी एस. टी. सावंत, लवू वारंग, सुशांत नाईक, विठ्ठल देसाई, सोनू सावंत, गणेश काटकर, सुशिल सावंत, महेश सावंत, विनोद मर्गज, योगेश सावंत, अॅड. संदीप राणे, किशोर राणे, अॅड. हर्षद गावडे, दामोदर सावंत, बच्चू प्रभुगावकर, सुशांत दळवी, समर्थ राणे, भास्कर राणे, अरुण परब, शेखर राणे, सुभाष राणे, राजन परब, रवींद्र गायकवाड, स्वप्नील चिंदरकर, महेंद्र सांब्रेकर, भाई परब, अजय सावंत, अभिजीत सावंत, शैलेश भोगले, संदेश सावंत-पटेल, समीर परब, प्रकाश सावंत, आप्पा सावंत, सावी लोके, शैली सावंत, निलम सावंत, स्वाती राणे आदी मराठा समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तहसीलदारांनी निवेदन स्वीकारण्याचा आग्रहछत्रपती शिवाजी महाराज चौक ते अप्पासाहेब पटवर्धन चौकापर्यंत मराठा समाज बांधवांनी रॅली काढली. यावेळी मराठा बांधवांसह भगिनीही रस्त्यावर उतरल्या होत्या. अप्पासाहेब पटवर्धन चौकात रास्ता रोको करण्यात आला. तसेच जोपर्यंत तहसीलदार चौकात येऊन निवेदन स्वीकारत नाहीत तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा पवित्रा मराठा समाज बांधवांनी घेतला होता.
अखेर प्रभारी तहसीलदार पी. बी. पळसुले यांनी चौकात येऊन निवेदन स्वीकारले. तसेच शासनाकडे निवेदन पाठविणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मराठा बांधवांनी महामार्ग मोकळा केला. तसेच पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजबांधव दाखल झाले.वागदे येथे महामार्ग रोखलावागदे-डंगळवाडी येथे महामार्गाच्या कामासाठी आणलेले सिमेंटचे पाईप महामार्गावर टाकून तो रोखण्यात आला होता. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी हे पाईप बाजूला करून महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला.जोरदार घोषणाबाजी !कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय मराठा समाज कार्यकर्त्यांनी एकत्र जमायला सुरुवात केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच याठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही,आरक्षण आपल्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, कणकवलीचे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच कणकवली शहरासह तालुक्यात पोलिसांची गस्त सुरू होती.शहिदांना आदरांजली !कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती दिलेल्या काकासाहेब शिंदे तसेच इतर शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच बंदसाठी सहकार्य केलेल्या रिक्षा संघटनेसह व्यापारी व इतर संघटनांचे आभार मराठा समाज बांधवांनी यावेळी मानले.