- अनंत जाधवसावंतवाडी : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून काही तांत्रिक बाबी पूर्ण करून केंद्र सरकार कडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून केंद्राकडे आमचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच राज्यातील केंद्र प्रमुखांची पदे भरण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाशी चर्चा झाली असून लवकरच ही सर्व रिक्त पदे भरली जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री दिपक केसरकर हे शनिवारी शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमा साठी सावंतवाडीत आले असता पत्रकारांशी बोलत होते. मंत्री केसरकर म्हणाले,राज्यात केंद्र प्रमुखांची पदे रिक्त आहेत ही पदे तत्काळ भरली गेली पाहिजेत यासाठी मी ग्रामविकास मंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. केंद्रप्रमुख पदे लवकर भरली गेली पाहिजेत तरच सुलभ शिक्षण देऊ शकणार पदे च रिक्त असतील तर शिक्षक शिकवणार तरी कसे असा सवाल ही त्यांनी उपस्थित करत ही पदे लवकरात लवकर भरणार असे स्पष्ट केले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाणार असून तसा प्रस्ताव केंद्र सरकार कडे आहे.त्यातील तांत्रिक त्रुटी दूर केल्या जातील असे सांगून मराठी भाषेचा विकासत्मक दर्जा ही वाढवण्यात येईल महाराष्ट्रात मराठी भाषेचा सर्वदूर वापर केला जातो तसा कर्नाटक व गोवा राज्यात ही मराठी भाषा पाठ्यपुस्तकात समाविष्ट कशी करता येईल यासाठी तेथील मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. मात्र सीमावाद व मराठी भाषा वाद हा वेगळा मुद्दा असल्याचे ही त्यांनी सांगितले .आपणास मराठी भाषा सर्वत्र पोचवण्यासाठी काम करायचे असून संमेलन तसेच मराठी भाषेचे कार्यक्रम देशा विदेशात आयोजित करावे लागतील असेही त्यांनी सांगितले.