सातारा : उन्हाळा सुरू झाला की आपोआपच जिभेवर आंबट तुरट चव रेंगाळू लागते. कारण हा हंगाम असतो फळांचा राजा असणाऱ्या आंब्यांचा. शहर परिसरात असणारी आंब्याची झाडे मोहोराने बहरू लागल्याने आंब्याचा हंगाम सुरू झाल्याची चाहूल सातारकरांना लागली असतानाच हंगामातील पहिल्या हापूस आंब्याचे आगमन सातारच्या बाजारपेठेत झाले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून रायवळ आंब्यांना मोहोर यायला प्रारंभ होतो. मात्र या महिन्यात हापूस आंबा बाजारात दाखल झाल्याने हंगामातील पहिला आंबा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. विक्रेत्याने देवगड हापूस आंबा सातारच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणला आहे. बाराशे रुपये डझन असा दर लावण्यात आला आहे. शंभर रुपयांना एक मिळणारा आंबा हा सर्वांच्या कुतूहलाचा विषय बनला आहे. हंगामातील पहिलाच हापूस आंबा असल्याने महाग आहे. त्यामुळे विक्रेत्यानेही काही डझनच आंबे विक्रीसाठी आणले आहेत. रिक्षाच्या हौद्यात बसून आंबा विक्रीसाठी शहरभर फिरविला जात आहे. मात्र, शंभर रुपयांना एक या दराने मिळणाऱ्या या आंब्याने सर्वसामान्यांचे तोंड आंबट होत आहे. तर पहिल्या हंगामातील पहिल्या आंब्याची चव चाखण्यासाठी वाटेल ती किंमत मोजणारे सातारकर हा आंबा खरेदी करताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)
सातारच्या बाजारपेठेत हापूस आंबा दाखल
By admin | Published: February 21, 2015 11:27 PM