कुडाळ : वेताळ-बांबर्डे येथील विवाहिता स्वराली साईप्रसाद चव्हाण (२३) हिने सासरी होणाऱ्या दिराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली असून या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात मृत स्वरालीचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिचा दिर इंद्रजित चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत स्वरालीचे वडील मनोहर मुणगेकर (रा. देवगड) यांनी पोलिसांत तक्रार दिली की, त्यांच्या मुलीचे २३ डिसेंबर २०१८ रोजी वेताळ-बांबर्डे येथील साईप्रसाद चव्हाण यांच्यासोबत लग्न झाले होते. साईप्रसाद हा गोवा येथे खासगी नोकरी करीत होता.
दरम्यान स्वराली ही आजारी असल्याने साईप्रसादने गोवा येथील नोकरी सोडून कुडाळ शहरात नोकरी पत्करली. वेताळ-बांबर्डे येथे स्वराली साईप्रसाद, सासरे तानाजी चव्हाण, सासु आनंदी चव्हाण व दिर इंद्रजित चव्हाण यांच्यासह एकत्र रहायची. आजारपणानंतर तिच्यावर मुंबईत उपचार केल्यानंतर ती बरी झाली होती.मात्र डिसेंबर २०१९ ते जानेवारी या कालावधीत स्वरालीचा दीर इंद्रजीत हा तिला आजारी असण्यावरून सारखा बोलायचा, शिवीगाळ करून मानसिक छळ करीत असे. स्वरालीने आम्हांला देवगड येथे आल्यानंतर या बाबतची माहिती दिली होती.
या संदर्भात तिचा पती साईप्रसादला कल्पना दिली होती. त्यानंतर ९ मार्च २०१९ रोजी वेताळबांबर्डे येथील घरी असताना स्वरालीला तुला कामे करता येत नाही असे सांगत इंद्रजित याने सांगत शिविगाळ केली व कोयता मारण्याकरिता तिच्या मागे लागला होता.
याची माहिती स्वरालीने दिल्यानंतर ११ मार्च रोजी तिला देवगड येथे घेवून जात असताना तिने आचरा येथे तिच्या आईसाठी एका प्लास्टिक बाटलीत उसाचा रस घेतला होता. देवगड येथील घरी आल्यानंतर दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास तिने उंदीर मारण्याचे औषध उसाच्या रसात मिसळून ते विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे तिला उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र १७ मार्च रोजी तिचा मृत्यू झाला. अशी माहिती मुणगेकर यांनी तक्रारीत दिली असून या प्रकरणी स्वरालीला शिविगाळ व तिचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिचा दिर इंद्रजित याच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी कुडाळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.