नवी दिल्ली : भारताची पाचवेळची जगज्जेती बॉक्सर एमसी मेरी कोम हिला मंगोलिया येथे सुरू असलेल्या उलानबटर कप बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाला. स्पर्धेत ५१ किग्रॅ वजनी गटातून सहभागी झालेली मेरी एक वर्षाच्या कालावधीनंतर बॉक्सिंग रिंगमध्ये उतरली आहे. स्पर्धेच्या पुढील फेरीत रशियाची अन्ना अडेमा आणि कोरियाची चोल मि बैंग यांच्यातील विजेत्या खेळाडूसह मेरीचा सामना होईल. त्याचवेळी, स्टँद्जा मेमोरियल स्पर्धेतील रौप्यविजेता मोहम्मद हसमुद्दिन (५६ किलो) आणि किंग्ज कप कांस्यविजेता रोहित टोकस (६४) यांनी आपापल्या लढती जिंकून पुरुष गटात विजयी कूच केली. हसमुद्दिनने किर्गिझस्तानच्या अलमानबेट एलीबेकोवला नमवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. चीनच्या मा जिन मिंगविरुद्ध त्याचा पुढील सामना होईल. दुसरीकडे, रोहितने रशियाच्या दोर्जो दाखाएव याला पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत मंगोलियाच्या चिनजेरिग बातारसुखविरुद्ध तो दोन हात करेल. त्याचप्रमाणे, राष्ट्रकुल आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यविजेता एल. देवेंद्रो सिंग (५२), किंग्ज कप सुवर्णविजेता श्याम कुमार (४९) आणि युवा आशियाई रौप्यविजेता अंकुश दहिया (६४) या तिन्ही खेळाडूंना पहिल्या फेरीत बाय मिळाला आणि या जोरावर त्यांनी आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. (वृत्तसंस्था)
मेरी कोम उपांत्यपूर्व फेरीत
By admin | Published: June 22, 2017 1:05 AM