वेंगुर्ला - वायंगणी बागायतवाडी येथे रविवारी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास कसला तरी मोठ्या आवाजाचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत वसंत गणेश फटनाईक (७०) व गणेश वसंत फटनाईक (२९) या पिता-पुत्रांचा अवघ्या अर्ध्या तासाच्या आत जळून जागीच मृत्यू झाला. मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
याबाबतची माहिती स्थानिक सागर सुरक्षारक्षक सुहास तोरसकर व सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी वेंगुर्ले पोलिस स्टेशनला तत्काळ देताच पोलीस निरीक्षक तानाजी मोरे , कॉन्स्टेबल डी. बी. पालकर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. संबधित घटनेचे वृत्त समजताच वायंगणी सरपंच सुमन कामत, ग्रामसेवक संदिप गवस, मिनल चव्हाण, उपसरपंच हर्षदा साळगांवकर, सदस्य सतीश कामत, बाळू कोचरेकर, चंद्रशेखर येरागी आदींनी तत्काळ धाव घेतली. पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमक बंबही तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. पण तोपर्यंत पिता-पुत्र गंभीर रित्या भाजून जागीच मृत्यूमुखी पडले होते. दरम्यान, यादुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या त्या दोन्ही पिता-पुत्राचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्याकरीता वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी संदेश निकम मित्रमंडळाची रुग्णवाहिका तत्काळ पाठविली.