दोडामार्ग : तालुक्यातील माटणे पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी सरासरी ६० टक्के मतदान झाले. सार्वत्रिक निवडणुकीत याच ठिकाणी ६५ टक्के मतदान झाले होते. मात्र, पोटनिवडणुकीत ते कमी झाले. त्यामुळे कमी झालेल्या मतदानाचा कोणाला फटका बसणार हे गुरूवारी होणा-या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.दोडामार्ग तालुका पंचायत समितीच्या माटणे गणातील सर्वच केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. भाजप, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होत असल्याने याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. भरत जाधव यांच्या निधनानंतर या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.सेनेकडून खुद्द तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, तर भाजपकडून रूपेश गवस आणि काँग्रेसने भाजपाचे माजी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सत्यवान गवस यांना काँग्रेसने रिंगणात उतरविल्याने लढत चुरशीची होणार आहे. भाजपच्या प्रचाराची धुरा जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांच्या खांद्यावर होती. तर शिवसेनेकडून तालुकाप्रमुख बाबुराव धुरी हे स्वत:च उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. स्वाभिमान पक्षाने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. मतदानावेळी कोठेही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. रात्री उशिरापर्यंत मतदानपेट्या मुख्यालयाच्या ठिकाणी आणण्याचे काम सुरू होते.सायंकाळी टक्केवारी वाढलीही निवडणूक प्रतिष्ठेची झाल्याने तिन्ही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मतदारांना बाहेर काढण्यासाठी बुधवारी धावपळ उडाली. सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदारांना बाहेर काढण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले होते. वृध्दांना खास करून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी गाडीची विशेष सोयही गावागावातील तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली होती. सायंकाळी ३.३० पर्यंत सरासरी ४९ टक्के मतदान झाले. मात्र, त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढली. दिवसभरात सरासरी ६० टक्के एवढे मतदान झाले.
माटणेत 60 टक्के मतदान, शिवसेना, काँग्रेस, भाजपमध्ये तिरंगी लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 9:54 PM