महेश सरनाईक
बांदा (सिंधुदुर्ग) : शहरातील आळवाडी येथे झोपड्या बांधून राहत असलेल्या परप्रांतीय मजूर कुटुंबातील ३ ते १० वयोगटातील ५ मुलांमध्ये गोवर सदृश्य लक्षणे आढळल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.
सद्यस्थितीत या परिसरात आरोग्य पथककडून सर्वेक्षण करण्यात आले असून अजून रुग्ण आढळून आले नाहीत. सिंधुदुर्गच्या माता बाल संगोपन अधिकारी सई धुरी यांनी आज या वस्तीला भेट देऊन माहिती घेतली. गोवर ही संसर्गजन्य साथ असल्याने स्थानिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस व सांगोला तालुक्यातून बहुरूपी कलेनिमित्त काही परप्रांतीय कुटुंबे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आली आहेत. १२ दिवस खारेपाटण येथे वास्तव्य केल्यानंतर ते बांद्यात दाखल झालेत. शहरातील आळवाडी मच्छिमार्केट नजिक त्यांनी झोपड्या उभारल्या आहेत.
१६ मे रोजी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण विभागात वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन यांना ५ मुलांमध्ये गोवर सदृश्य लक्षणे आढळून आली. वैद्यकीय यंत्रणेने याची गंभीर दखल घेत तात्काळ सर्व संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले. हे नमुने तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. संशयित रुग्ण हे वय वर्षे ३,७, ९ व १० वर्षांचे आहेत. सुरुवातीला यातील २ बालकांचे प्रकृती गंभीर होती. मात्र आता सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. पटवर्धन यांनी दिली.
गोवर झाल्यास रुग्णामध्ये ताप, अंगावर पुरळ व सर्दी अशी लक्षणे आढळतात. हा संसर्गजन्य आजार असल्याने आरोग्य विभागाने तात्काळ या परिसरात सर्वेक्षण केले. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आरती देसाई, आरोग्य सेविका अनुज्ञा नाईक, आरोग्य सेवक दीपेश मेजारी यांनी आळवाडी येथील झोपडपट्टीत राहणारे मजूर तसेच परिसरातील सर्व स्थानिकांची वैद्यकीय माहिती घेण्यात आली.
मात्र या मजूर वस्तीतील बालकांशिवाय अन्य कोणीही संशयित रुग्ण याठिकाणी आढळून आला नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. मात्र आरोग्य विभागाचे या परिसरात लक्ष असून दररोज या रुग्णांची माहिती घेण्यात येत आहे.