सिंधुदुर्गनगरी : शालेय जीवनात विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी वेळेत व आवश्यक पाणी पिणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषदच्या १४१४ शाळांमध्ये वॉटर बेल ही संकल्पना राबविणार असल्याचे सांगून शिक्षण सभापती डॉ. अनिशा दळवी यांनी याची तत्काळ अंमलबजावणी करा असे आदेश दिले. शाळा सुरू असतानाच्या कालावधीत मुलांनी अर्धा लिटर पाणी प्यायला हवे, याकडे शिक्षकांनी लक्ष द्या अशा सूचनाही दळवी यांनी केल्या.जिल्हा परिषद शिक्षण समितीची मासिक सभा सभापती डॉक्टर अनिशा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली बॅरिस्टर नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, समिती सदस्य उन्नती धुरी, राजन मुळीक उपस्थित होते.सभापती दळवी यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी चर्चा घडवून आणली. प्रत्येक शाळेत स्वयंपाक मदतनीस आहे का?, पिण्याच्या पाण्याची सोय आहे का? पोषण आहारावर विशेष लक्ष दिला जातो का? यासह अन्य प्रश्न सचिव तथा शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना विचारले.
आंबोकर म्हणाले, जिल्हा परिषदच्या १४०० शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आहे. फक्त कणकवली तालुक्यातील फोंडा व बेळणे तर मालवण तालुक्यातील बांदिवडे तेरई शाळेत पाण्याची व्यवस्था नाही. या ठिकाणी अन्य ठिकाणावरून पाणी आणून विद्यार्थ्यांची तहान भागवली जाते. यावर सभापती यांनी मुलं योग्य पोषण आहार व स्वछ पाणी पितात का? दररोज अर्धा लिटर पाणी विद्यार्थी पितात का? याकडे शिक्षकांनी लक्ष द्या. तसेच दर दोन तासांनी विद्यार्थ्यांनी एक ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. यासाठी वॉटर बेल ही संकल्पना अमलात आणा. वॉटर बेल झाली की विद्यार्थ्यांनी पाणी प्यावे, याकडे शिक्षकांनी लक्ष द्या, असे आदेश सभापतींनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.
क्रीडा शिष्यवृत्ती लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाची दरपत्रक मागितली आहेत. अशी माहिती शिक्षणाधिकारी यांनी दिली. प्रशासकीय कामांच्या मान्यता मिळाल्यानंतर त्याच वर्षात काम पूर्ण करा, अशा सूचना सभापतींनी दिल्या.शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन पूर्णशालेय बाल कला व क्रीडा महोत्सवाची माहिती उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी दिली. आंगणे म्हणाले, २ ते १० डिसेंबर या कालावधीत केंद्रस्तरावर स्पर्धा होणार आहेत. १२ ते १७ डिसेंबर या दरम्यान प्रभागस्तरावर स्पर्धा होणार आहे. २० ते २४ डिसेंबर या कालावधीत तालुका स्तरावर तर ३०,३१ व १ जानेवारीमध्ये ओरोस येथील डॉन बॉस्को हायस्कूल येथे जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहे.
प्रत्येक खेळाची नियमावली तयार करून ती संबंधितांकडे पाठवली जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याच्या ११०० खेळाडूंना स्पोर्ट्स शूज दिले जाणार आहेत. अशी माहिती आंगणे यांनी दिली. तर जिल्हास्तरावर आलेल्या विद्यार्थ्यांना वेगेळे गिफ्ट देण्याचा विचार असल्याचे शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी दिली.