मालवण : कोळंब पुलावरील वाहतुकीच्या विषयावरून स्वाभिमान व शिवसेना सदस्यांमध्ये जोरदार जुंपली. कोळंब पूल दुरुस्तीसह घरबांधणीची परवानगी ग्रामपंचायतीमार्फत मिळणार असल्याचे निवडणुकीपूर्वी आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केले होते. मात्र, अद्याप ग्रामपंचायतीकडून अशी परवानगीच मिळत नसल्याने आमदारांनी जनतेची घोर फसवणूक केल्याचा आरोप पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगावकर, राजू परुळेकर यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत केला.पंचायत समितीची सभा सभापती सोनाली कोदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगावकर, राजू परुळेकर, अजिंक्य पाताडे, विनोद आळवे, कमलाकर गावडे, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, छाया परब, गायत्री ठाकूर, खात्याचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी पंचायत समिती सदस्या मधुरा चोपडेकर यांनी या पुलावरून दुचाकी वाहतूक सुरू असल्याचे सांगताच घाडीगावकर, परुळेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. सिमेंटच्या पोत्यांवरून दुचाकींची वाहतूक होत असून यात अपघात झाल्यास त्याची जबाबदारी शासन घेणार का? असा प्रश्न केला. त्यामुळे सध्या पुलावरून सुरू असलेली वाहतूक ही अनधिकृतच असल्याचा आरोप घाडीगावकर यांनी केला.
यावर सार्वजनिक बांधकामचे अधिकारी प्रकाश चव्हाण यांनी येत्या १५ तारीखपर्यंत पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर अवजड वाहनांची वाहतूक सुरू होण्यासाठी आवश्यक चाचणी होईल. या चाचणीनंतर हे पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुले केले जाईल असे सांगितले.
कुडाळ तालुक्यातील सोनवडे गावाला जोडणाऱ्या कर्ली खाडीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन होऊन दोन-तीन महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, अद्याप या पुलाच्या कामाला का सुरुवात झाली नाही असा प्रश्न घाडीगावकर, परुळेकर व आळवे यांनी उपस्थित केला. यावर पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी हे काम कुडाळ विभागाच्या अखत्यारित येत असून याची सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेण्यात यावी, असे सांगितले.ही केवळ आमदारांची स्टंटबाजी : घाडीगावकरकोळंब पुलावरून १ मे पासून वाहतूक सुरू होईल असे बांधकामच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, अद्याप हे पूल वाहतुकीस खुले झाले नसून केवळ दुचाकी वाहतूक सुरू आहे. सर्व प्रकारची वाहतूक सुरू न झाल्याने आमदारांनी केवळ फोटो काढून वाहतूक सुरू झाल्याचा दिखावा केला आहे. अद्यापही अधिकृत वाहतूक सुरू झाली नसून आमदार नाईक हे केवळ स्टंटबाजी करीत असल्याचा आरोप सुनील घाडीगावकर यांनी केला.