सिंधुदुर्ग : आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी मनुष्यबळ वाढविले जाईल. त्याचबरोबर सद्यस्थितीत काम करणाऱ्या परिचारिकांच्या नियुक्तीबाबत लवकरच बैठक घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिपरिचारिकांनी एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याविरोधात अघोषित आंदोलन केले होते. त्या पार्श्वभूमीवर मंत्री सामंत यांनी रविवारी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन तेथील परिचारिकांशी संवाद साधून समन्वय घडवून आणला.यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, संदेश पारकर आदी उपस्थित होते.यावेळी परिचारिकांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. मनुष्यबळ कमी असल्याने कामाचा ताण येत असून काही अधिकाऱ्यांकडून त्रास देण्यात येतो, असे सांगितले.यावेळी खासदार विनायक राऊत यांनी आरोग्य आणि वित्त मंत्र्यांशी चर्चा करून परिचारिकांच्या नियुक्तीबाबत बैठक घ्यावी, अशी सूचना केली. पालकमंत्री सामंत म्हणाले, परिचारिकांना योग्य त्या सोयी-सुविधा तत्काळ रुग्णालय प्रशासनाने पुरवाव्यात. त्यांच्या शासन स्तरावरील मागण्यांबाबत लवकरच बैठक घेण्यात येऊन पाठपुरावा केला जाईल, असे सांगितले.त्यानंतर पालकमंत्री सामंत यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने महावितरणचीही आढावा बैठक घेतली. ते म्हणाले, प्रकाशगड येथून अतिरिक्त मनुष्यबळ घेऊन नुकसानग्रस्त भागातील वीज जोडण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. या कामात स्थानिक ग्रामस्थांचेही चांगले सहकार्य मिळत आहे हे कौतुकास्पद आहे. महावितरणने उर्वरित २६ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करावे. खासदार राऊत यांनीही आवश्यक साधनसामग्री घेण्याबाबत सूचना केली. यावेळी मुख्य अभियंता किशोर परदेशी, इक्बाल मुलाणी, विनोद पाटील, उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार उपस्थित होते.कोविड रुग्णांसाठी बेड वाढविण्याच्या सूचनापालकमंत्री सामंत यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबतही आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांसाठी वाढीव बेडची सुविधा करावी. मिशन ऑक्सिजनअंतर्गत जिल्ह्यात ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभे करण्यासाठी संबंधित कंपन्यांशी करार करावेत. यानंतर त्यांनी आयुष रुग्णालयाच्या सुरू असणाऱ्या बांधकामाची पाहणी करून अभियंत्यांना सूचना केल्या.
परिचारिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठक : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 7:34 PM
CoronaVirus Sindhudurg : आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी मनुष्यबळ वाढविले जाईल. त्याचबरोबर सद्यस्थितीत काम करणाऱ्या परिचारिकांच्या नियुक्तीबाबत लवकरच बैठक घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
ठळक मुद्देपरिचारिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठक : उदय सामंत ताण कमी करण्यासाठी मनुष्यबळ वाढविले जाईल