कणकवली : सिंधुदुर्गातील आकारी पड, आंबोली- चौकुळ येथील कबुलायतदार प्रश्न, अपूर्ण असलेले टाळंबा, नरडवे धरण प्रकल्प, वनसंज्ञा यासारखे प्रलंबित प्रश्न येत्या दोन वर्षात शिंदे सरकारच्या माध्यमातून आपण सोडवणार आहे. सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती माजी खासदार निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली. कणकवली शिंदे गट शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भास्कर राणे, दिलीप घाडीगावकर, दिनेश तेली उपस्थित होते.सुधीर सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्ष आपण काम करीत आहे. त्यावेळी काँग्रेस पक्ष मजबूत केला. त्यानंतर राजीनामा देवून काँग्रेस पक्ष सोडल्यावर सर्व कार्यकर्त्यांना शिवसेनेत पाठवले. तेव्हा पासून शिवसेनेला प्रत्येक निवडणूकीत मदत केली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे शिवसेनेच्या त्यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे माझ्याबरोबर काम केलेल्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करावा. त्याच जोमाने आपण मिळून जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी भक्कम काम करू असे आवाहनही त्यांनी केले.ते पुढे म्हणाले, गद्दार कोण आणि खरा कोण ? हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आपल्या कामातून सिद्ध करतील. जगातले सर्व उद्योग आणण्याची ताकद महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात आहे. एखादा प्रकल्प बाहेर गेला म्हणून फरक पडत नाही. जिकडे फायदा तिकडे उद्योगपती जात असतात. पर्यटन विकास आणि गावागावात उद्योग निर्माण करण्यावर आमचा भर राहणार आहे. समृद्ध आणि आनंदी गावाचा प्रकल्प सिंधुदुर्गात आम्ही राबवत आहोत यात सर्व लोकांनी सहभागी व्हावे.शिंदे गटात अनेकजण प्रवेश करणारशिंदे गटाच्या कार्यकारीणीबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, शिंदे गट शिवसेनेत अनेकजण प्रवेश करणार आहेत. लवकरच जिल्ह्याची कार्यकारीणी आम्ही घोषित करणार आहोत. तसेच मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत कणकवली कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
"सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक"
By सुधीर राणे | Published: September 23, 2022 4:08 PM