कणकवली : कणकवली तालुक्याची पाणी टँचाई आराखडा आढावा बैठक डिसेंबर महिन्यात झाली आहे. आता फेब्रुवारी महिना संपत आला तरी या आराखड्यातली कामे मंजूर झालेली नाहीत. ही कामे कधी मंजूर होणार ? पुढील महिन्यात 'मार्च एडिंग' असल्याचे कारण सांगून तुम्ही कामे करणार नाही. मग सामान्य जनतेने पाण्यासाठी जायचे कोठे? पाणी टँचाईच्या कामांबाबत एवढी अनास्था का ? असे प्रश्न उपस्थित करीत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचायत समिती सदस्यांनी शुक्रवारी धारेवर धरले.दरम्यान, पाणी टँचाईच्या कामांचा प्रस्ताव देऊनही तो रद्द का करण्यात आला? याचे उत्तर द्या, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले .त्यामुळे सभेतील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते.कणकवली पंचायत समितीची मासिक सभा प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात सभापती सुजाता हळदिवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसभापती सुचिता दळवी, गटविकास अधिकारी मनोज भोसले, सहायक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण आदी उपस्थित होते.या सभेत प्रामुख्याने पाणी टँचाई आराखड्याचा मुद्दा चर्चेत आला. पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी तो उपस्थित केला होता. यावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता घुरसाळे यांनी प्राप्त प्रस्तावांचे सर्व्हेक्षण करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी मेस्त्री तसेच मनोज रावराणे यांनी आता सर्व्हेक्षण करणार तर मग त्या कामांना मंजुरी कधी मिळणार? तसेच ती कामे सुरू कधी होणार? असे प्रश्न उपस्थित केले.पाणी टँचाईची कामे लवकर करता यावीत यासाठी आमदार नितेश राणे यांनी आढावा बैठक लवकर लावली. मात्र, अजून कामांचे सर्व्हेक्षणच सुरू असेल तर पुढिल प्रक्रिया कधी होणार ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तसेच तुम्ही ही कामे रद्द होण्याची वाट बघताय का? असा संतप्त सवाल करीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच गटविकास अधिकारी मनोज भोसले यांना संबधित कामांचा पाठपुरावा करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची तत्काळ नेमणूक करा असे सांगितले. तर या कामांचा तातडीने पाठपुरावा करण्यात येईल असे गटविकास अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.कोणतेही काम प्रलंबीत असेल आणि त्याबाबत विचारणा केली तर एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे अधिकारी बोट दाखवितात. अशी स्थिती प्रत्येक सभेत पहायला मिळते. याबद्दल पंचायत समिती सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या परिस्थितीत लवकरात लवकर सुधारणा करावी अशी मागणीही करण्यात आली.शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कार्यान्वित करण्यात आली असून त्यासाठी सर्व सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन कृषी अधिकारी सुभाष पवार यांनी यावेळी केले. तसेच २२ ते२६फेब्रुवारी या कालावधीत तहसील कार्यालयात अंतिम यादी निश्चित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.घोणसरी धरणाची परिपूर्ण माहिती पुढील सभेत आंबडपाल येथील अभियंत्यांनी द्यावी .अशी मागणी मनोज रावराणे यांनी या सभेत केली. तर तहसील कार्यालयाशी निगडित अनेक विषय असतात. त्याबाबत सदस्यांना माहिती देण्यासाठी अथवा त्या समस्या सोडविण्यासाठी तहसील कार्यालयातील एका अधिकाऱ्याला सभेला उपस्थित रहाण्यास सांगावे,अशी मागणी प्रकाश पारकर यानी केली.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून धुळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याबाबत संबधित ठेकेदार कँपनीला काळजी घेण्यास सांगावे.तसेच आगामी काळात पाणी टँचाई उदभवू नये यासाठी अनधिकृत रित्या संबंधितांकडून होणारा पाणी उपसा तत्काळ बंद करावा.अशी मागणी मिलिंद मेस्त्री यांनी केली. या विषयांसह अन्य विविध विषयांवर या सभेत चर्चा करण्यात आली. तसेच ठरावही मांडण्यात आले.त्याचबरोबर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांना व्यावसायिक दराने वीज पुरवठा न करता तो घरगुती दराने करावा अशी मागणी प्रकाश पारकर यांनी केली. भाग्यलक्ष्मी साटम तसेच इतर सदस्यांनी त्याला पाठींबा दिला. तसा ठराव करून वरिष्ठ स्तरावर पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.विजवितरणचे अधिकारी अनुपस्थित !या सभेला विजवितरणचे अधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे त्या विभागाविषयीचे प्रश्न सदस्यांना उपस्थित करता आले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच सभेला अनुपस्थित रहाणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.शिक्षण विभागाला रिक्त पदांचा फटका !कणकवली गटशिक्षणाधिकारी पद गेली अनेक वर्षे रिक्त असून त्याचा पदभार शिक्षण विस्तार अधिकारी संदेश किंजवडेकर यांच्याकडे आहे. तर या विभागाच्या कार्यालयीन पदांबरोबरच मुख्याध्यापक तसेच अन्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाला रिक्त पदांचा फटका बसत असल्याचे या सभेत घेतलेल्या शिक्षण विभागाच्या आढाव्याच्या वेळी उघड झाले.