सावंतवाडी : अपघातामध्ये आपल्या मुलाची कोणतीही चूक नसतानाही सावंतवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष नांदोस्कर हे पदाचा गैरवापर करून वेळोवेळी पैशाची मागणी करीत आहेत. पैसे न दिल्यामुळे स्वत:च्या पदाचा गैरवापर करीत आपल्या मुलाला मानसिक त्रास देत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन न्याय द्यावा, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा विष्णू केदार यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक रणजीत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला. यावर देसाई यांनी तत्काळ लक्ष वेधून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देऊ नये, असे सांगून केदार यांना दिलासा दिला.निवेदनात म्हटले आहे की, ३० मार्च रोजी मुलगा शुभम केदार सावंतवाडी आयटीआय येथून घरी येत होता. दरम्यान, रस्त्यामध्ये संतोष नांदोस्कर यांचा मुलगा कुणाल नांदोसकर, शुभम कळंगुटकर व बोरभाटकर नामक मुलगा हे ट्रीपल सीट एका मोटारसायकलने भरधाव वेगाने भोसले पॉलिटेक्निकहून सावंतवाडीच्या दिशेने घरी जात असताना रस्त्यात अपघात होऊन खाली पडले. यावेळी माझा मुलगा शुभम केदार हा समोरून येत होता. पण त्याच्यामुळेच हा अपघात झाल्याच्या गैरसमजातून पुत्रप्रेमाची पट्टी डोळ्यावर बांधून संतोष नांदोसकर यांनी आपला मित्र सचिन सावंत या पोलीस कर्मचाऱ्यासह या घटनेचा सदोष व स्वत:च्या मुलाच्या चुकांवर पांघरूण घालणारा पंचनामा केला. माझ्या मुलाला दोषी ठरवत त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला नाहक मानसिक त्रास दिला आहे. वास्तविक माझा मुलगा निर्दोष आहे व त्यासंबंधीचे पुरावे माझ्याजवळ आहेत. आमच्या गाडीला या अपघातामुळे साधा ओरखडाही पडलेला नाही. संतोष नांदोसकर यांनी आमच्याकडे पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यामुळे स्वत:च्या पदाचा गैरवापर करून ते माझा मुलगा शुभम केदार यास मानसिक त्रास देत आहेत. त्यामुळे माझ्या मुलाची मानसिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्याचे वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त होत चालले आहे. या घटनेचा त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. या घटनेमुळे शुभमच्या जीवितास धोका उत्पन्न झाल्यास पंचनामा करणारे संतोष नांदोसकर व त्यांनी मिळविलेले खोटे साक्षीदार यांना सर्वश्री जबाबदार धरण्यात यावे. या घटनेमध्ये गांभीर्याने लक्ष घालून लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. अन्यथा नाईलाजाने आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही विष्णू केदार यांनी दिला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी याचा तपास करण्याचे आश्वासन दिले असून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई न देण्याची सूचना केली आहे. यामुळे केदार यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी लक्ष्मण कदम, आर्यन परब, संतोष तळवणेकर, परशुराम केदार, बाळू पार्सेकर, सर्वेश केदार, संदीप गोरे, प्रवीण म्हाडगुत, राजन केदार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
पदाचा गैरवापर करत पोलिस देताहेत मानसिक त्रास
By admin | Published: May 10, 2016 2:12 AM