मालवण : युवा कार्यक्रम आणि केंद्रीय खेल मंत्रालय, नेहरू युवा केंद्राचे मालवण तालुका समन्वयक व व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजचा विद्यार्थी ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर व शिक्षा समागम, दिल्ली जी-२० ची सहभागी भाग्यश्री जनार्दन मांजरेकर यांची दिल्ली येथे आजादी का अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमात निवड झाली आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे समारोपीय पर्व सुरू असून ‘माझी माती, माझा देश’ हा उपक्रम देशभरात उत्साहात राबविला. या टप्प्यात ‘वसुधा वंदन’, ‘शिलाफलकम्’, ‘पंचप्रण शपथ’, ‘शहीद वीरांच्या कुटुंबीयांचा सन्मान’ असे उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वांना मातृभूमी प्रेमाच्या एकाच धाग्याने जोडणारा ‘अमृत कलश यात्रा’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.जिल्ह्यात ग्रामस्तरावर ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत अमृत कलश यात्रा काढून घरोघरी माती गोळा करण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका. सर्व पंचायत समित्या, सर्व ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. दिल्लीत अमृत वाटिका तयार करण्यासाठी देशाच्या कोनाकोपऱ्यातून तब्बल ७ हजार ५०० कलशांमधून माती घेऊन अमृत कलश यात्रा काढण्यात आली.अमृत वाटिका एक भारत- श्रेष्ठ भारत या वाचन बद्धतेचे प्रतीक आहे. शुक्रवार २७ ऑक्टोबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे कलश घेऊन आल्यावर उपमुख्यमंत्री आणि संसद सदस्यांच्या उपस्थितीत एक भव्य कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर एक नोव्हेंबर रोजी अंतिम सोहळ्याचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले आहे. या अंतिम सोहळ्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व हे येथून ऐश्वर्य मांजरेकर व भाग्यश्री मांजरेकर करणार आहेत. यावेळी नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्गचे जिल्हा युवा अधिकारी मोहितकुमार सैनी, आई-वडील, मित्रपरिवार व जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
मेरी माटी, मेरा देश: ऐश्वर्य, भाग्यश्री मांजरेकर सिंधुदुर्गचे दिल्लीत प्रतिनिधित्व करणार
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 27, 2023 3:39 PM