सावंतवाडी: देशात पार पडत असलेल्या पाच राज्याच्या निवडणुकीत भाजप चांगली कामगिरी करीत असून तीन राज्यात भाजप सरळ सत्तेवर येईल तर दोन राज्यात चांगली कामगिरी करेल असा दावा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हादई प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात गोवा नक्की जिंकेल आणि आम्हाला महाराष्ट्र ही मदत करेल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री सावंत हे कुणकेरी येथे देवदर्शना निमित्त आले होते. त्यावेळी माजी आमदार राजन तेली यांच्या सावंतवाडीतील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,माजी आमदार राजन तेली प्रथमेश तेली,मनोज नाईक, अजय गोंदावळे, आनंद नेवगी,दिलीप भालेकर,बंड्या सावंत,प्रमोद सावंत,सुधीर आडिवरेकर, अमित परब, केतन आजगावकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले,देशात पाच राज्यात निवडणूका होत असून यातील चार राज्यात मी स्वता प्रचाराला गेलो होतो.त्यामुळे मला तेथील स्थिती माहीत आहे.नक्कीच आम्ही तीन राज्यात विजयश्री मिळवू तर तेलंगणा आणि मिझोराम मध्ये चांगली कामगिरी करू असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
म्हादई प्रश्नी गोवा सरकार आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात जोमाने माडत असून नक्कीच आम्हाला यश मिळेल बुधवारी न्यायालयात सुनावणी होती.पण ती पुढे ढकलली आहे.म्हादई च्या लढ्यात महाराष्ट्र सरकार ही आम्हाला मदत करेल असा विश्वास त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरेच रूग्ण हे गोवा बांबुळी येथे येतात त्यांना तेथे पुरेसी आरोग्य सुविधा आपण देतो मात्र यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या जन आरोग्य योजनेचे कार्ड हे सरकारी रूग्णालया बरोबर खाजगी रूग्णालयात ही त्याचा वापर झाला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करेन असे यावेळी त्यांनी सांगितले तसेच रोजगार मेळावा हा सरकार घेऊ शकत नाही एखाद्या खाजगी संस्थेने पुढाकार घ्यावा आम्ही सर्व प्रकारे मदत करू असे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले.