रत्नागिरी : राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेले महेश तथा बाबू म्हाप यांना शिवसेनेने रत्नागिरी पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे लवकरच म्हाप यांचा सत्कार केला जाणार आहे. राष्ट्रवादीच्या या खेळीमुुळे म्हाप यांची राजकीय कोंडी होणार काय, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. उदय सामंत राष्ट्रवादीतून सेनेत गेले, त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते व पदाधिकारीही सेनेत दाखल झाले होते. सामंत यांच्याबरोबर त्यांचे समर्थक असलेले महेश म्हाप हेसुुध्दा सेनेत दाखल झाल्याचे सांगण्यात येत होते. म्हाप हे सेनेच्या कार्यक्रमांमध्येही सक्रिय होते. मात्र, त्यांनी पंचायत समिती निवडणूक राष्ट्रवादीतून लढवली होती. त्याचा त्यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे आता म्हाप हे सेनेत कार्यरत असले तरी ते राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य आहेत. रत्नागिरी पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे सेनेच्या कोणत्या सदस्याच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. मात्र, मूळ सेनेच्या कोणालाही हे पद न मिळता राष्ट्रवादीचे सदस्यत्व असलेले बाबू म्हाप यांना सभापती बनविण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीकडे पंचायत समिती सभापतीपद आल्याने म्हाप यांचा लकरच सत्कार केला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)सभापतीपदावर बाजी...रत्नागिरी पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे सदस्य मंगेश साळवी, महेंद्र झापडेकर यांची नावे चर्चेत होती. मात्र या दोघांऐवजी आयत्यावेळी विधानसभा निवडणुकीच्यावेळी सेनेत दाखल झालेले बाबू म्हाप यांनी सभापतीपदावर बाजी मारली आहे. म्हाप हे अजूनही राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पंचायत समिती सदस्य आहेत.राष्ट्रवादीचे तीन सदस्य...रत्नागिरी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले तीन सदस्य आहेत. महेश म्हाप, विवेक सुर्वे व स्मिता भिवंदे यांचा त्यात समावेश आहे. यातील म्हाप यांनी आमदार सामंत यांच्याबरोबर सेनेत प्रवेश केल्याने यावेळी सभापतीपदाचा लाभ त्यांना झाला आहे.
म्हाप यांना मिळणार घरचा आहेर
By admin | Published: January 20, 2016 11:48 PM