मालवण : शहरातील भरड भागातील कुमार कॉम्प्लेक्सनजीकच्या विहिरीत पडलेल्या म्हैशीला सामाजिक कार्यकर्ते महेश गिरकर व मालवण नगरपरिषदेचे स्वच्छता मुकादम रमेश कोकरे यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नातून बाहेर काढण्यात आले. विचित्र बांधणीच्या या विहिरीत पडलेल्या म्हैशीला अथक प्रयत्नांतून दोरीच्या सहाय्याने बाहेर काढून नागरिकांनी तिला जीवदान दिले.
मालवण भरड भागातील कुमार कॉम्प्लेक्सनजीकच्या अॅड. संजय शरद गांगनाईक यांच्या जागेत जुन्या काळातील व जुन्या बांधणीची विहीर आहे. या विहिरीचे तोंड जमिनीच्या पृष्ठभागाशी समांतर असल्याने काहीशा धोकादायक अशा या विहिरीवर प्लास्टिक कापड घालण्यात आले होते.
सोमवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास विहिरीनजीकच्या मोकळ्या भागात गवत चरण्यासाठी आलेल्या म्हशींच्या कळपातील एक म्हैस विहिरीच्या दिशेने आली. प्लास्टिक कापडामुळे तिला विहिरीचा अंदाज न आल्याने कापडावर पाय ठेवताच ती थेट विहिरीत कोसळली. यावेळी तेथे असलेल्या अमित सावंत या मुलाला म्हैस विहिरीत कोसळल्याचे दिसल्याने त्याने याबाबतची माहिती वडील आपा सावंत यांना दिली. आपा सावंत यांनी याची माहिती नगरपरिषदेस दिली. यावेळी नगरसेवक यतीन खोत व नगरपरिषदेचे स्वच्छता मुकादम रमेश कोकरे घटनास्थळी दाखल झाले. विहिरीची खोली जास्त नसली तरी विहिरीच्या जुन्या विचित्र बांधणीमुळे विहिरीचा आयताकृती आकार निमुळता असल्याने म्हैशीला हालचाल करणेही कठीण बनले होते. त्यामुळे यातून म्हैशीला बाहेर कसे काढायचे हा प्रश्न जमलेल्या नागरिकांना पडला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश उर्फ डुबा गिरकर यांना पाचारण करण्यात आले. यावेळी दीपेश पवार, गणेश चिंदरकर, पप्या नाईक, कुणाल खानोलकर, रामकृष्ण देसाई, रमाकांत अटक, शांती मांजरेकर, निषाद देसाई, महेंद्र करंगुटकर, गणेश पाडगावकर, अरविंद मोंडकर, देवानंद लुडबे, आपा सावंत, विलास मुणगेकर, विजय खरात, किशोर खानोलकर शिल्पा खोत, महानंदा खानोलकर, पल्लवी तारी, शालन सावंत आदी नागरिक उपस्थित होते.सर्वांनी सोडला सुटकेचा नि:श्वास घटनास्थळी दाखल झालेल्या महेश गिरकर व रमेश कोकरे यांनी प्रसंगावधान राखत विहिरीत उतरून म्हैशीला मजबूत दोरीच्या सहाय्याने बांधले. दोरी बांधल्यावर उपस्थित सर्व नागरिकांनी जोर लावून दोरी ओढून म्हैशीला विहिरीबाहेर काढण्यात यश मिळविले. म्हैस विहिरीबाहेर आल्यावर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.