कणकवली : कणकवली समर्थनगर येथे जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या फरशी बसविणाऱ्या परप्रांतीय कामगाराचे अपहरण करण्यात आले. त्याला बेदम मारहाण करत त्याच्या एटीएम मधून रोख रक्कम तसेच मोबाईल लंपास करण्याचा प्रकार कणकवलीत एक रिक्षा चालक व त्याच्या सहकाऱ्याने केला. ही घटना सोमवारी घडली. त्यामुळे कणकवली शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली. दरम्यान, कणकवली पोलिसांनी याघटनेबाबत तक्रार दाखल होताच चौवीस तासात तातडीने तपासाची चक्रे फिरवीत सीसीटीव्ही फुटेज तपासून दोघा संशयित आरोपींना शिताफीने अटक केली आहे. या घटनेबाबत कणकवली पोलिस ठाण्यात धीरेंद्रकुमार श्रीकांत यादव (वय-३२,रा. उत्तरप्रदेश) याने तक्रार दिली आहे. धिरेंद्रकुमार हा फरशी बसविण्याचे काम करतो. २५ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता तो दुचाकीने कणकवलीत आला होता. आपले बाजारातील काम केल्यावर तो शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकात रेल्वे स्टेशनजवळील समर्थनगरकडे जाण्यासाठी रिक्षा (क्रमांक एम.एच.०७-ए.एच. २९४९) मध्ये बसला.रिक्षामध्ये चालक अल्ताफ अख्तार (रा. कलमठ, गावडेवाडी) याच्यासह त्याचा सहकारी आरोपी सुहास घोगळे (कलमठ) रिक्षात होता. त्यांनी धीरेंद्रकुमारला मारहाण करत गोव्याच्या दिशेने घेऊन गेले.पुन्हा दुसऱ्या दिवशी मंगळवारी कुडाळात आणले. त्याच्याकडील एटीएम कार्ड घेत पासवर्ड घेऊन १८ हजार रुपये तसेच मोबाईल काढून घेत त्याला कुडाळ बसस्थानक येथे सोडून देत पसार झाले. धिरेंद्रकुमारने याबाबत आपल्या मुकादमाला माहिती दिली. यानंतर कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरविली. पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल हाडळ, राजेंद्र गाडेकर, शरद देठे, हवालदार पांडुरंग पांढरे ,वाहतूक पोलिस हवालदार विनोद चव्हाण यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी या तपासात सहभागी झाले होते.पोलिसांनी कुडाळ येथे जाऊन आरोपीनी पैसे काढलेल्या एटीएम सेंटरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असात रिक्षाचा शोध लागला. रिक्षाच्या क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला. त्याने आपण कलमठ येथील अल्ताफ याला रिक्षा दिल्याचे सांगितले. गुरुवारी सकाळी त्याच्या कलमठ येथील घरी जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केल्यावर सुहास घोगळे याचे नाव निष्पन्न झाले. त्यालाही ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी करून अल्ताफ आणि सुहास या दोघांना कणकवली पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास उपनिरिक्षक राजेंद्र गाडेकर करत आहेत.
Sindhudurg: कणकवलीतून परप्रांतीय कामगाराचे अपहरण, रिक्षाचालकासह एकास अटक
By सुधीर राणे | Published: December 29, 2023 1:12 PM