कणकवली: नरडवे नाक्यावर गांजा विक्री करणाऱ्या एका परप्रांतीय युवकास कणकवली पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय सूत्रांच्या माहितीवरून काल, रविवारी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी उमाकांत मुनेद्रकुमार विश्वकर्मा (वय-२४, रा. मध्यप्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून १३०ग्रॅम गांजासदृश पदार्थ जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विक्रीचे प्रमाण अधिक प्रमाणावर वाढू लागले आहे. त्यामुळे अंमली पदार्थ विक्री व खरेदी करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी कणकवली पोलिसांना नरडवे नाक्यावर एक संशयित गांजासदृश पदार्थ विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी नरडवे नाक्यावर सापळा रचला. यावेळी उमाकांत विश्वकर्मा हा संशयित गांजासदृश पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने फिरताना आढळला. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या जवळील बॅगमध्ये असलेला १३० ग्रॅम सुमारे ५ हजार रुपये किमतीचा गांजासदृश पदार्थ व मोबाईल जप्त केला.
ही कारवाई पोलिस निरीक्षक अमित यादव, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर, राजकुमार मुंढे, हवालदार पांडुरंग पांढरे, चंद्रकांत झोरे, विनोद चव्हाण, सचिन माने आदींनी केली. याप्रकरणी पोलिस शिपाई सचिन माने याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीला आज, सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.