रत्नागिरी : दूध उत्पादकांच्या दुधाच्या बिलाचे पैसे आता त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जावेत, असा फतवा शासनाने काढला आहे. मात्र, उत्पन्नापेक्षा यासाठीची प्रक्रियाच अडचणीची असल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादकांमधून विरोध होत आहे. ही पद्धत बंद करा, अन्यथा आम्ही संस्थांना दूध घालणेच बंद करू, अशी भूमिका जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी आजच्या बैठकीत घेतल्याने जिल्ह्यातील हा व्यवसाय पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर आहे.शासनाने दुग्ध उत्पादकांच्या दुधाचे बिल थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत दूध उत्पादकांची राष्ट्रीयीकृत बँकेत खाती उघडण्यासाठी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास कार्यालय, सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) आणि स्टेट बँक आॅफ इंडियाच्या येथील शाखेतर्फे दुग्ध उत्पादक सहकारी संस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मार्र्गदर्शन करण्यासाठी मुंबईच्या सहकारी संस्थांच्या विभागीय निबंधक मीना आहेर, स्टेट बँंक आॅफ इंडियाचे (मुंबई) उपमहाप्रबंधक संदीप सोपारी, विभागाचे सहायक सरव्यवस्थापक बाळकृष्ण कानडे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी एस. के. कांबळे, सहकारी संस्था (दुग्ध)चे सहायक निबंधक संजय कांबळे, जिल्हा उपनिबंधक राजेंद्र महाजन आदी उपस्थित होते. शहरातील माध्यमिक अध्यापक पतपेढीत झालेल्या या बैठकीला जिल्ह्यातील सर्व संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव उपस्थित होते. मात्र, यावेळी संस्थांनी यासाठी जोरदार आक्षेप घेतला. बहुसंख्य दूध उत्पादक सहकारी संस्था ग्रामीण भागात आहेत. पूर्वी या संस्थांमध्ये गावातील शेतकऱ्यांकडून दूध संकलन केले जात असे. सर्व शेतकऱ्यांच्या एकूण दुधाचे बिल हे संस्थेच्या खात्यावर जमा होत असे. त्यातून संस्था प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या दुधाचे पैसे वितरीत करीत असत. मात्र, शासनाच्या नवीन फतव्यामुळे आता या शेतकऱ्यांना आपल्या गावातून आपल्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी बँकेच्या ठिकाणी १२ ते १५ किलोमीटर प्रवास करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)अडचणीत दुग्ध व्यवसाय बहुसंख्य शेतकरी दिवसाला १ ते २ लीटर दूध संस्थांना वितरीत करतात. त्यांना यातून १५ दिवसांनी मिळणाऱ्या २०० ते ५०० रूपयांसाठी अर्धा दिवस वाया घालवून बँकेत यावे लागणार आहे. यासाठी १०० ते २०० रूपयांचा खर्च करावा लागणार आहे. या अडचणी संस्थांनी आजच्या बैठकीत मांडल्या. आधीच येथील दूध व्यवसाय अडचणीत आहे. त्यातच आता शासनाने दूध बिल थेट बँक खात्यात जमा करण्याचा फतवा काढला, तर आम्ही संस्थेकडे दूध घालण्याचेच बंद करू, असा इशारा या उत्पादकांनी अधिकाऱ्यांना दिला.
दूध बिलाचे पैसे आता थेट खात्यावर
By admin | Published: February 03, 2015 10:48 PM