सिंधुदुर्गनगरी : दूध उत्पादनास गती मिळू लागली असून, सिंधुदुर्गातून दररोज गोकुळ (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ)मार्फत १० हजार लिटर दूध संकलन केले जाते. जिल्ह्यात सुमारे ४० हजार लिटर दुधाचे उत्पादन दरदिवशी होऊ लागले आहे. जिल्ह्यात या व्यवसायाला चालना मिळावी यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा बँक व गोकुळ यांचे प्रयत्न सुरू आहेत. दहा ते वीस गावांत एक याप्रमाणे सिंधुदुर्गात ‘स्वयंसेवक’ तयार करण्याचा निर्णय ‘गोकुळ’चे व्यवस्थापकीय संचालक दत्तात्रय घाणेकर व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या भेटीदरम्यान झाला.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व कृषी, पशुसंवर्धन सभापती रणजित देसाई यांनी सिंधुदुर्गनगरी येथील मुख्यालय पत्रकारांचा दौरा बुधवारी कोल्हापूर दूध उत्पादक सहकारी संघ गोकुळ येथे आयोजित केला होता.‘गोकुळ’ने सहकार क्षेत्रात घेतलेली भरारी प्रगतीच्या शिखरावर पोचलेली आहे. दूध उत्पादनामध्ये हा संघ जगात १६व्या, तर देशात ७व्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. दर दिवशी साडेनऊ लाख लिटर्स दुधाचे संकलन हा संघ करीत असून मुंबईसह लगतच्या जिल्ह्यातील दुधाची गरज गोकुळमार्फत पुरविली जाते. याच व्यवसायातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा पुरवून दुधाचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करते. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी भर टाकण्याचा प्रयत्न करते. कोल्हापूरसह कर्नाटक सीमा, सांगली, सातारा या भागातही गोकुळने दूध संकलन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून दुग्ध व्यावसायिक निर्माण केले आहेत. यातून जिल्ह्यातील १८०० शेतकऱ्यांना कागल चिखली येथे या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले आहे. (प्रतिनिधी)दुग्ध व्यवसायातील आदर्शचिखली (जि. कोल्हापूर) येथील अरविंद पाटील यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यांनी नोकरीकडे न वळता पशुपालनामार्फत दूध व्यवसाय करण्याचे ठरविले. त्या अनुषंगाने त्यांनी सुरुवातीला पंढरपुरी, जाफराबादी मादी प्रकारच्या नऊ म्हशी कर्ज काढून विकत घेतल्या. ९ म्हशींची टप्प्याटप्प्याने आता ९० जनावरे झाली आहेत. ९० गार्इंचा गोठा आणि दुग्ध उत्पादनाचा या तरुणाचा हा प्रकल्प पाहिल्यानंतर आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही, असे देसाई म्हणाले. ...तर सिंधुदुर्ग व्यवसायात श्रीमंतपाटील कुटुंबाची प्रचंड मेहनत, अभ्यास या व्यवसायात महत्त्वाचा आहे. खुला गोठा व बंदिस्त दुग्धपालनातून त्यांची महिन्याची कमाईही जवळजवळ दीड लाखाच्या घरात आहे. असे आदर्श निर्माण झाल्यास सिंधुदुर्ग श्रीमंत जिल्हा बनू शकेल. जि.प.चे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी याच उद्देशाने ‘गोकुळ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक व पत्रकार दौऱ्याचे आयोजन केले होते.
दूध व्यवसायात आता ‘स्वयंसेवक’
By admin | Published: December 19, 2014 9:47 PM