जैतापूर : झपाट्याने वाढत असलेल्या जैतापूर परिसरात नव्याने मिनी एसटी डेपो होणार असल्याने अनेक वर्षांच्या मागणीला हिरवा कंदील मिळाला आहे. या भागात डेपो एस. टी. डेपो व्हावा, यासाठी माजी सरपंच शैलजा माजरेकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले होते. ही मागणी आमदार राजन साळवी यांनी उचलून धरली व आता त्याची पूर्तता होत आहे. रत्नागिरीचे विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी जैतापूर एस. टी. स्टँडशेजारी असलेल्या जागेची पाहणी केली. त्यावेळी राजापूरचे आगारप्रमुख बी. जी. डावरे, सुहास वेल्हाळ, पी. के. लोंढे उपस्थित होते. या सर्वांनी आगारासाठी आवश्यक असलेल्या जागेची पाहाणी केली व या ठिकाणी मिनी डेपो होण्यासंदर्भातील प्रकल्प अहवाल तयार करण्याची सूचना दिली. जैतापूरच्या सरपंच माजरेकर यांनी यापूर्वी तयार केलेला आगारासंदर्भातील अहवाल देशमुख यांना सादर करण्यात आला. यापूर्वी लेखी पत्रव्यवहार सुरु असल्याचे व आवश्यक त्या निधीसंदर्भातील मागणीची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे डेपो होण्याच्या हालचालींना वेग आला आहे.पाहणीनंतर एस. टी. अधिकाऱ्यांनी आगारासाठी जागा पुरेशी असल्याचा अभिप्राय व्यक्त केला. त्या ठिकाणी असलेल्या इमारतीचा उपयोग आरक्षण विभाग, विद्यार्थी सवलत पास विभाग, नियंत्रण कक्ष व कर्मचाऱ्यांसाठी वापरता येणे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. या ठिकाणी एस. टी. उपाहारगृह सुरु करण्यात येईल व सर्व गाड्या जैतापूरमध्ये येऊन पुढील प्रवासासाठी रवाना होतील, असेही यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.एस. टी. डेपोसाठी लागणारी जागा अधिक रुंद व त्या जागेचे सपाटीकरण करण्यात आले असून, मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विहिरीच्या बाजूची जागाही मोकळी करण्यात येणार आहे. एस. टी. डेपोमध्ये जैतापूरच्या विकासात भर पडणार आहे. जैतापूर बाजारपेठेला उर्जितावस्था प्राप्त होणार असल्याने जैतापूर व्यापारी मंडळाने सरपंच माजरेकर व एस. टी. अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत. यावेळी उपसरपंच प्रसाद माजरेकर, शाखाप्रमुख राजन कोंडेकर, सचिन नारकर, संदीप माजरेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
जैतापूरला मिनी एसटी डेपो
By admin | Published: February 06, 2015 11:15 PM