आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. २६ : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील बचत गटांना मिनीट्रॅक्टर ट्रॅक्टर व शेती उपयोगी उपसाधने बचत गटाचे उत्पन्न वाढावे या हेतुने देण्यात येत आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील बचत गटांना मिनीट्रॅक्टर व शेती उपयोगी उपसाधने यांचा पुरवठा करणे योजना राबविली जाते, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील बचत गटांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे अशा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी खालील कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सिंधुदुर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन पोस्ट कार्यालयाचे समोर सिंधुदुर्गनगरी यांचेकडे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्य आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग जयंत चाचरकर यांनी केले आहे.
योजनेचे अर्ज या कार्यालयामध्ये विनामुल्य उपलब्ध आहे.अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, स्वयंसहाय्यता बचत गटातील 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत व ते महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. बचत गटातील सदस्यांची यादी व पुर्ण पत्ता, नाव, जात व संपकार्चा मोबाईल-दुरध्वनी क्रमांक. बचत गटातील मागासवर्गीय सदस्यांचे जातीचे दाखले, रहीवाशी दाखले, रेशनिंग कार्ड झेरॉक्स प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
बॅक खाते पास बुकची झेरॉक्स प्रत. बचत गटातील प्रत्येक सदस्याचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असल्याचे व हे खाते सदर सदस्यांचे आधार क्रमांकाशी संलग्न केलेले असणे आवश्यक आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय, दिनांक ८ मार्च २0१७ मध्ये नमुद केले प्रमाणे स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनीट्रॅक्टर-ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्याची पावती किंवा आरटीओ कार्यालयाकडे नोंद केल्याचे पुरावे सादर करणे आवश्यक आहे, त्यानंतर अनुदान ३.१५ लक्ष रुपये बचत गटाचे बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.