सावंतवाडी : केसरी येथे महसूल विभागाच्या आशीर्वादाने जोरदार माती उत्खनन सुरू आहे. माती उत्खननाच्या नावाखाली येथील मायनिंग उत्खनन करण्याचाच हा प्रकार असल्याचे समोर येत आहे. याठिकाणी जेसीबी व डंपर यांच्या सहाय्याने हे उत्खनन सुरू असून दोन ते तीन दिवस शासकीय सुट्टी असल्याने हे अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने सुरू आहे. केसरी येथे मायनिंग तसेच माती उत्खननास कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सांगितले तर नायब तहसीलदार शशिकांत जाधव यांनी माती उत्खननाला जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी दिल्याचे म्हटले आहे.केसरी येथे छुप्या पद्धतीने माती उत्खननाचे काम शुक्रवारपासून सुरू झाले आहे. या कामी जेसीबी तसेच डंपरही या घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. मातीच्या नावाखाली मायनिंगचे उत्खनन सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दाणोली तलाठी कार्यालय बंद असून याबाबत स्थानिकांनी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उत्खननाबाबत माहिती देऊनही सायंकाळपर्यंत हे उत्खनन सुरूच होते. दोन वर्षांपूर्वी केसरी येथे अशाचप्रकारे उत्खनन सुरू करण्यात आले होते. त्यांना खनिज विभागाने मोठा दंड आकारला आहे. मात्र, पुन्हा एकदा सर्व नियम धाब्यावर बसवून हे उत्खनन सुरू झाल्याने आता कोण कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. या उत्खननाबाबत प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, माती उत्खननाची कोणतीही परवानगी केसरी गावात दिलेली नाही. तसेच माती उत्खनन होत असल्यास चौकशी करण्यास सांगणार असून कोण दोषी असेल त्यांच्याकडून दंडाची रक्कम आकारण्यात येणार असल्याचे यावेळी इनामदार यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत नायब तहसीलदार शशिकांत कदम यांना विचारले असता, केसरी येथे माती उत्खननाची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्याचे म्हटले आहे. दोन वर्षांनंतर प्रथमच अवैध मायनिंग उत्खननाला सुरूवात झाली आहे. वाळू खडी यांची वाहतूक बंद असताना मायनिंग उत्खनन सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
केसरी येथे मातीच्या नावाखाली मायनिंग उत्खनन
By admin | Published: April 03, 2015 9:33 PM