तळवडे : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मार्गावरून होणारी मायनिंग वाहतूक रोखून ग्रामस्थांनी बुधवारी तीव्र विरोध केला. त्यामुळे डंपरचालक व ग्रामस्थ यांच्यात वाद निर्माण होऊन वातावरण तणावपूर्ण बनले. मळगाव मार्गावर यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी जात मध्यस्थी करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अडवलेल्या डंपरचालकांनी पोलिसांत तक्रार केली. तर सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर यांनी वाहतुकीस कायमच बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने मायनिंग वाहतुकीचा वाद मळगावात उफाळल्याचे दिसून आले.मळगाव बाजारपेठेतून मायनिंग वाहतूक करणारे तीनशेपेक्षा डंपर ये-जा करीत असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, बाजारपेठेतील ग्राहकांना अपघाताचा धोका तसेच मुख्य मार्गावर असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना याचा अनेकवेळा फटका बसला आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत मायनिंग वाहतुकीलाबाजारपेठेतून बंदी घालण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून डंपरना मळगाव बाजारपेठेत रोखून धरण्यात आले. यामध्ये सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते विजय हरमलकर, गजानन सातार्डेकर, संजय नाटेकर, दाजी सावंत, भाऊ गोसावी यांनी तीव्र विरोध केला. यावेळी डंपरचालक व ग्रामस्थ यांच्यात वादावादी झाली. सुमारे दोन तास चाललेल्या या वादाने वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गटांना बाजूला करत वातावरण निवळले. पण ग्रामस्थांनी काही केल्या वाहतूक होऊ देणार नसल्याचा निर्णय घेतल्याने चालकही आक्रमक झाले. यावर पोलिसांनी तोडगा काढण्याचे सांगून तात्पुरती मलमपट्टी केली. पण अडविलेले डंपरचालक गुरुप्रसाद गावडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)मळगाव बाजारपेठेतून वाहतूक करणारे मायनिंगचे डंपर ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना धोकादायक आहेत. शिवाय बाजारपेठेत या डंपरमुळे दैनंंदिन वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यावर ग्रामस्थ ठाम आहेत. - गणेशप्रसाद पेडणेकर, सरपंच, मळगाव डंपर वाहतूक गेली काही वर्षे याच मार्गावरून सुरू आहे. रेडी ते कळणेपर्यंत असणाऱ्या सर्व गावांतील बाजारपेठेतूनच ही वाहतूक होते. मळगाव ग्रामस्थांचा हा निर्णय न पटणारा आहे. तरीही ग्रामपंचायतीने पर्यायी मार्गाची सोय केल्यावर तेथून वाहतूक केली जाईल. यासाठी आवश्यक ते सहकार्य वाहतूक संघटना करेल. - जितेंद्र गावकर अध्यक्ष, दत्तप्रसाद डंपर चालक-मालक संघटना.
मळगावात मायनिंग वाहतुकीचा वाद पेटला
By admin | Published: February 11, 2016 12:44 AM