सावंतवाडी : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा आज, गुरूवार पासून सुरू झाला असून ते रविवारी 4 फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरेंच्या दौऱ्याचे स्वागत करतानाच विकास कामावरून चिमटा काढला आहे. तुम्ही अडीच वर्षांत काही दिले नाही पण एकनाथ शिंदे यांनी कोकणात अनेक विकासाचे प्रकल्प दिले. लोकांना विकास हवा आहे. मनोरंजन नको असा टोलाही लगावला.मंत्री केसरकर हे सिंधूरत्नच्या बैठकीसाठी मळगाव येथे आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील अधिकारी वर्गाची सिंधुरत्नची आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, अमित कामत, राजन पोकळे, सचिन वालावलकर, क्षितिज परब आदी उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, ज्या मराठा बांधवाकडे कुणबी दाखले आहेत त्यांनाच कुणबी दाखले देण्याचा निर्णय जुनाच आहे. त्यावरून कुणाची नाराजी उद्भवण्याची गरज नाही. मंत्री छगन भुजबळ हे सरकारमधील ज्येष्ठ मंत्री आहेत ते नाराज नसून समता परिषदचे काम करत असल्याने ते कदाचित सरकारच्या निर्णयावर भाष्य करीत असावेत असे मत व्यक्त केले. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत सर्व विषयावर चर्चा होत असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले. मंत्री भुजबळ यांच्या बाबतीत आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी स्पष्ट बोलण्याचे टाळले. मात्र मुख्यमंत्री त्यांना समज देतील भुजबळ ज्येष्ठ मंत्री असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.लोकांना विकास हवा, मनोरंजन नको उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर त्यांनी टिका करताना अडीच वर्षांत कोकणला काही दिले नाही. बोलून लोकांचे मनोरंजन होणार नाही हाताला काही तरी काम दिले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंतवाडी मतदारसंघात कोटयवधीचा निधी दिला. त्याची भूमिपूजन लवकरच होणार आहेत. मात्र आम्ही ठाकरेचे स्वागत करतो कारण ते ज्येष्ठ व्यक्तीमत्व आहे. मात्र त्यांनी आपण मुख्यमंत्री म्हणून कोकणला काय दिले ते बघावे तसेच पर्यटन मंत्री यांच्यामुळे अनेक प्रकल्प रद्द झाले अशी टिका ही मंत्री केसरकर यांनी केली.
उद्धव ठाकरेंचे स्वागत, पण अडीच वर्षांत कोकणला काय दिले; मंत्री दीपक केसरकरांचा सवाल
By अनंत खं.जाधव | Published: February 01, 2024 6:09 PM