सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर हे कंपन्या बदलाव्यात तसे पक्ष बदलतात. त्यामुळे त्यांनी आपण कधीही भाजपात जाणार नाही याचे प्रतिज्ञापत्र द्यावे. नुसत्या घोषणा करून लोकांमध्ये भ्रम पसरवू नये. जी जनतेला आश्वासने दिलीत त्यातील अर्धी तरी कामे करावीत. प्रवक्तेगिरी करून लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत अशी टिका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांनी मंत्री केसरकरांवर केली.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. साळगावकर म्हणाले, मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन करत असताना हे रूग्णालय या जागेवर होणार नाही याची माहिती केसरकरांना होती. मग या जागेवर रूग्णालय उभारण्याचा हट्टहास का? यापुर्वीच बाहेरचावाडा येथे रूग्णालय उभारण्यासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे, ती जागा संपादीत करून रेंगाळलेला प्रश्न मार्गी लावला पाहिजे अशी मागणी साळगावकर यांनी केली.मागील तेरा वर्षात नुसत्या घोषणा करण्याचे काम केले आहे. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न सुटणे गरजेचे होते परंतू दुदैवाने तसे झाले नाही. राजघराण्याची जागा आहे त्यावर त्याचा दावा आहे हे माहित असताना सुध्दा त्यांनी या ठिकाणच्या जागेसाठी आग्रह धरला आणी भूमिपुजन केले असा आरोप ही साळगावकरांनी केला.केसरकरांनी मतदारांमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम केलेकेसरकरांनी नेहमी विकासाच्या नावावर मतदारांमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम केले आहे. रघुनाथ मार्केटचे तब्बल चार ते पाच वेळा उदघाटन करण्यात आले. त्या ठीकाणी दोन तीन दिवसांसाठी महिलांना उभे करून ठेवण्यात आले. मात्र त्यानंतर ते बंद अवस्थेत आहे. त्यामुळे आश्वासने देण्यापेक्षा त्यांनी किमान एक तरी काम पुर्ण करावे असे आवाहन साळगावकर यांनी केले.
कंपन्या बदलाव्या तसे पक्ष बदलणारे केसरकर भाजपात जातील, बबन साळगावकरांचे टीकास्त्र
By अनंत खं.जाधव | Published: November 11, 2022 5:12 PM