अनंत जाधव सावंतवाडी: दोडामार्ग तालुक्यातील विजघर येथील महालक्ष्मी विद्युत निर्मिती प्रकल्पाला तिलारी धरणातून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाटबंधारे विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही विद्युत निर्मिती कंपनी गेल्या बारा वर्षांपासून वीजनिर्मितीचे काम करत असून पहिल्यांदाच या कंपनीला मंत्री केसरकर यांनी शॉक दिला आहे.तिलारी या आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या पाण्यावर विजघर येथे महालक्ष्मी विद्युत निर्मिती प्रकल्प 2010 मध्ये आघाडी सरकारच्या काळात उभारण्यात आला आहे. या विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी तिलारी धरणातून किती पाणी घ्यायचे यांची कोणती ही नोंद पाटबंधारे विभागाकडे नाही. कंपनीशी झालेल्या करारात ही नमूद करण्यात आले नाही. विशेष म्हणजे तिलारी धरणाचे गेट हे या विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या तोंडावर असल्याने प्रकल्पाला धरणातून किती पाणी जाते याचा अंदाज येत नाही. तसेच या विज निर्मिती प्रकल्पातून तयार करण्यात आलेल्या विजेचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोणताही फायदा नाही. ही सर्व वीज बाहेरच्या जिल्ह्यांना पुरविण्यात येते. त्यामुळे याचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसतो.तिलारी पाटबंधारे प्रकल्प हा 16 टीएमसीचा आहे. मात्र सध्या या धरण क्षेत्रात 54 टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. पावसाळ्यात हे धरण क्षेत्र पूर्ण पणे भरलेले असते. उन्हाळ्यात धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने याच्या झळा या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना बसतात. परिणामी धरण लाभ क्षेत्रातील शेतीला तसेच बागायतीला पाणी मिळत नाही.अनेक वेळा यावर आंदोलने झाली, मात्र कोणीही दखल घेतली नाही. सोमवारी (दि.27) मंत्री केसरकर यांनी आयोजित केलेल्या बैठकीतही दोडामार्ग मधील काही शेतकऱ्यांनी पाणी मिळत नसल्याचा मुद्दा लावून धरला. त्यानंतर मंत्री केसरकर यांनी याच बैठकीत अधीक्षक अभियंता विजय थोरात यांना विजघर विद्युत निर्मिती प्रकल्पाचे पाणी तत्काळ बंद करा पाच कोटीची वीज आणि पन्नास कोटीचे पाणी कसे शक्य फायदा कोणाला या सगळ्याची चौकशी लावण्याचे सांगत पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी त्याचा रोख कंपनीवर कमी आणि राजकीय विरोधकांवर जास्त होता. त्यातच ही कंपनी विरोधी पक्षनेते अजित पवार याच्या जवळच्या व्यक्तीची असल्याने केसरकर यांना आयती संधी आल्याचे बोलले जात आहे.आमचे शेतकऱ्यांचे सरकार : केसरकर या विद्युत प्रकल्पाला उन्हाळ्यात पाणी देणे शक्य नाही. पावसाळ्यात हवे तेवढे पाणी द्या महाराष्ट्रात स्थापन झालेले सरकार हे शेतकऱ्यांचे आहे असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्याचे आदेश, मंत्री केसरकरांचा विद्युत निर्मिती प्रकल्पाला शॉक
By अनंत खं.जाधव | Published: March 29, 2023 6:28 PM