अक्कल सांगण्यासाठी आलेल्यांना “अकलेचे तारे” दाखवून दिले, मंत्री नारायण राणेंचा अजित पवारांना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 04:24 PM2022-01-13T16:24:43+5:302022-01-13T16:26:20+5:30
आपला व बँकेचा कोणताही संबंध नाही. आपण जे कर्ज काढले आहेत त्याच्या व्याजापोटी वर्षाला सात ते आठ कोटी रुपये बँकेत भरतो.
सिंधुदुर्ग : अक्कल सांगण्यासाठी आलेल्यांना अकलेचे तारे दाखवून दिले, असा टोला जिल्हा बँक अध्यक्ष निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे महाविकास आघाडीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. दरम्यान गद्दारीचा वारसा असलेल्या लोकांच्या ताब्यात असताना बँकेची बदनामी झाली. मात्र आता नव्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या ताब्यात बँक सुरक्षित राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपला व बँकेचा कोणताही संबंध नाही. आपण जे कर्ज काढले आहेत त्याच्या व्याजापोटी वर्षाला सात ते आठ कोटी रुपये बँकेत भरतो. आतापर्यंत फक्त दोन ते तीन वेळा मी बँकेत आलो आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा बँक अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी बँकेचे मावळते अध्यक्ष सतीश सावंत यांचे नाव न घेता टीका केली. त्यांचा वारसा गद्दारीचा आहे, अशा लोकांना आपण पळवून लावले आहे. त्यामुळे याचा लपूनछपून फिरण्याची परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. तो एक अपशकून होता, असे सांगत त्यांनी येणाऱ्या काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी गोरगरीब लोकांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी पदाधिकारी उपस्थित होते.