आॅनलाईन लोकमतकुडाळ, दि. १३ : विद्यार्थी, कर्मचारी आणि उमेदवारांना वेठीस न धरण्याच्या सूचना देत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्प संख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी जातपडताळी प्रमाणपत्र तत्काळ देण्याचे आदेश दिले.मंत्री कांबळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात वैश्यवाणी समाजातर्फे माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली आणि संदेश पारकर यांनी जातपडताळणी प्रमाणपत्राबाबत कांबळे यांच्याकडे लक्ष वेधले. वडील, काका, आतेभाउ किंवा रक्तातील नात्याचा एकजरी पुरावा पुरावा मिळाला तरी तत्काळ जातपडताळणी प्रमाणपत्र द्या, अशा स्पष्ट शब्दात कांबळे यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. कागदपत्रांसाठी उमेदवारालाही वेठीस धरणे चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले.
जातपडताळणी कार्यालय सिंधुदुर्गात आणणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातपडताळणी कार्यालय आणण्याच्या मागणीनंतर तसा आपण प्रयत्न करु, प्रसंगी महसूल विभागाच्या जादा कर्मचाऱ्यांचा वापर करु, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या मागणीमुळे जिल्ह्यात जातपडताळणी कार्यालय सुरु होण्याला गती येणार आहे. या बैठकीत माजी आमदार प्रमोद जठार यांनी याबाबत पुढाकार घेतला होता. यामुळे मागासवर्गीय समाजाला मोठा फायदा होणार आहे.