सावंतवाडी : सावंतवाडी शहरातून चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला शाळकरी मुलगा मंगळवारी रात्री मध्यप्रदेशातील मेहरणा येथे नाट्यमयरित्या सापडला. मुंबईतून बिहारच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमधून मध्यप्रदेश येथे कामानिमित्त जात असताना ट्रक चालकाने दाखविलेल्या चलाखीमुळेच हा मुलगा सापडला. या मुलाला आणण्यासाठी सावंतवाडी पोलिसांचे पथक मध्यप्रदेशला गेले असून गुरुवारी त्याला सावंतवाडीत आणण्यात येणार आहे.सावंतवाडी शहरातील उभाबाजार-पांजरवाडा येथून एक शाळकरी मुलगा क्लासला जातो म्हणून सांगून घरातून निघून गेला होता. तो उशिरापर्यंत घरी आला नसल्याने आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करीत शोधाशोध सुरू केली.मुलाकडे असलेल्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांनी काढले. त्यावेळी तो रत्नागिरीमध्ये असल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी मळगाव रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.या तपासणीत हा मुलगा कोकणकन्या गाडीसाठी जात असल्याचे दिसले. यावेळी तो एकटाच गाडीत चढत असल्याचे आढळल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक मुंबई येथे पाठविले.या पथकाने मुंबईत थांबून तपास केला. पण मुलगा सतत जागा बदलत असल्याने पोलिसांना तो सापडत नव्हता. अखेर पोलीस पथक माघारी परतले होते. दरम्यान, सोमवारी रात्री हा मुलगा मुंबई येथून बिहारकडे जाणा-या ट्रकमध्ये चढला होता. त्याने चालकाला मला मध्यप्रदेशमध्ये सोडा, असे सांगितले. चालकाने त्याला ट्रकमध्ये बसवून घेतले आणि थोडा प्रवास केल्यानंतर त्याची विचारपूस केली. त्यावेळी ट्रकचालकाच्या लक्षात आले की हा मुलगा आई-वडिलांना सोडून पळून आला आहे.मुलाच्या गळ््यात असलेल्या शाळेच्या ओळखपत्रावरून ट्रकचालकाने मुलाच्या शाळेत संपर्क साधला व संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर शाळेतून याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्या ट्रकचालकाशी संपर्क करून मुलाला सोडू नका आणि तुम्ही जेथे असाल तेथून जवळ असलेल्या पोलीस ठाण्याशी संपर्क करा. तेथे थांबा असे सांगितले होते. या सूचनेवरून त्यानंतर तो ट्रकचालक मुलाला घेऊन मध्यप्रदेशातील मेहरणा पोलीस ठाण्यात थांबला होता.मुलगा नोकरीसाठी मध्यप्रदेशमध्येसावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक मध्यप्रदेशातील मेहरणा येथे पाठविले. तेथून त्या मुलाला ताब्यात घेतले असून, हे पथक गुरुवारी सावंतवाडीत पोहोचणार आहे. मुलगा नोकरीच्या शोधासाठी मध्यप्रदेश येथे जात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. गुरुवारी हा मुलगा सावंतवाडीत पोहोचल्यानंतर अधिक माहिती मिळेल, असे सांगण्यात येत आहे.
ट्रकचालकाने दाखविली चलाखी : बेपत्ता मुलगा मध्यप्रदेशात सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 6:56 PM