सावंतवाडी : आंबोली येथे आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या गुजरात-बडोदा येथील अंकित चव्हाण यांचा मृतदेह राजापूर येथील रेल्वे बोगद्यात २५ जानेवारीला आढळून आला होता. मात्र, पोलिसांनी माहिती प्रसारित करूनही कोणीही आले नसल्याने त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
मात्र, तब्बल दीड महिन्यानंतर सोशल मीडियावरून आलेल्या माहितीच्या आधारे अंकित चव्हाण यांच्या कपड्यांवरून नातेवाईकांनी ओळख पटवली असल्याची माहिती सावंतवाडी पोलिसांनी दिली.आंबोली येथील स्कूलमध्ये अंकित चव्हाण यांचा मुलगा असून, त्याची सुटी संपल्याने त्याला सोडण्यासाठी चव्हाण हे गुजरात-बडोदा येथून आले होते. त्याला सोडून रेल्वेने पुन्हा गुजरातकडे जात असताना राजापूर येथील बोगद्याजवळ ते रेल्वेतून खाली कोसळले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना २५ जानेवारीची असून, राजापूर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. ९ दिवस होऊनही कोणीही न आल्याने प्रशासनानेच अत्यसंस्कार केले.मात्र, सोशल मीडियावरून राजापूर येथे मृतदेह मिळाल्याची माहिती प्रसारित झाली होती, हे चव्हाण यांच्या नातेवाईकांना समजले. त्यामुळे त्यांनी शोधाशोध केली. तसेच राजापूर पोलिसांशी संपर्क केला. त्यावेळी राजापूर पोलिसांनी हे कपडे नातेवाईकांना दाखविले. त्यावेळी मृतदेह अंकित यांचा असल्याचे पुढे आले आहे.
याबाबत सावंतवाडी पोलिसांनाही माहिती देण्यात आली असून तब्बल दीड महिन्यानंतर बेपत्ता चव्हाण यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. चव्हाण बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी सावंतवाडी पोलिसांशी संपर्क केला होता. त्यानंतर पोलिसांनीही शोधाशोध केली, पण ते सापडू शकले नव्हते.