कुडाळ : आतापर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंजूर केलेल्या सहा याद्यांमध्ये कुडाळ तालुक्यातील एकूण १२१ शिक्षकांना निवडश्रेणीसाठी पात्र ठरविले. त्यापैकी २० शिक्षकांची सेवापुस्तके गहाळ झाल्याचे पेन्शन अदालतमध्ये उघड झाल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे उपाध्यक्ष गंगाराम अणावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.कुडाळ तालुका पेन्शन अदालतीवेळी सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे अरुण सावंत, प्रकाश सावंत, अरुण साळगावकर, चंद्रकांत राऊळ यांनी सेवानिवृत्तीचा प्रश्न मांडून चर्चा घडवून आणली. यावेळी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, निवडश्रेणी मंजूर झालेल्या १२१ शिक्षकांपैकी किती शिक्षकांना प्रत्यक्ष लाभ दिला, या प्रश्नावर कोणतेही ठोस उत्तर शिक्षण विभाग प्रशासनाचे अधिकारी देऊ शकले नाहीत. कार्यवाही सुरू आहे, असे फक्त गुळमुळीत उत्तर तळकटकर यांनी दिले. प्राथमिक शिक्षकांना अर्जितचे रजा रोखीकरण करता येत नाही, म्हणून ज्या २१८ शिक्षकांना यापूर्वी लाभ दिला, त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्याच्या नोटिसा बजावण्याचे आदेश तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले. तशा नोटिसा तालुकास्तरापर्यंत पोहोचल्या. मात्र, प्रत्यक्षात संबंधित शिक्षकांना नोटिसा बजावून रक्कम वसुलीची कार्यवाही थांबवली, असे लेखा अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर वसुली थांबवणार असाल तर इतरांना अर्जित रोखीकरणाचा लाभ दिलाच पाहिजे, अशी भूमिका संघटना पदाधिकाऱ्यांनी मांडली. अनुदान उपलब्ध नसल्यामुळे १ एप्रिल २०१५ नंतर निवृत्त झालेल्यांना निवृत्तीनंतरचे लाभ देता आले नाहीत, असे प्रशासनातर्फे सांगितले. माणगाव येथील निवृत्त शिक्षिका मिशाळ हिची वैद्यकीय बिले कुडाळ शिक्षण विभागाने गहाळ केल्याचे उघड झाले. (प्रतिनिधी)
वीस शिक्षकांची सेवापुस्तके गहाळ
By admin | Published: November 26, 2015 9:34 PM