कणकवली: तुम्ही स्वतःच्या कार्यालयाचे बाथरूम तीन वर्ष पूर्ण करू शकत नसाल तर तालुक्यातली पुल, साकव, रस्त्यांची कामे काय करणार? तुमच्यासारखा दिरंगाई करणारा अधिकारी आतापर्यंत कधी बघितला नाही, अशा शब्दात आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांना फैलावर घेतले.वागदे, डंगळवाडी साकवाला मंजुरी मिळाली व कार्यारंभ आदेश मिळाला. पण अद्याप काम सुरु का होत नाही ? सोमवारपर्यंत हे काम सुरू न झाल्यास तुमच्या कार्यालयासमोरच येऊन भूमिपूजन करू, असा इशाराही यावेळी वैभव नाईक यांनी दिला.सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयाकडून सुरू न झालेल्या व अपूर्ण असलेल्या बजेटमधील व एफडीआर मधील कामांचा आढावा आमदार नाईक यांनी शुक्रवारी कार्यालयाला भेट देवून घेतला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, रुपेश आमडोस्कर, सचिन आचरेकर, ललित घाडीगावकर, रवी गावडे, नितीन ताटे व इतर उपस्थित होते.हळवल रेल्वे उड्डाण पुलासाठी कन्सल्टन्सी नेमन्याकरिता ४० लाख रुपये उपलब्ध करून दिले. त्यानुसार कन्सल्टन्सीचा अहवाल आला. मात्र वर्ष होत आले तरी आपल्याकडून कोणतीच कार्यवाही होत नाही. येथील शासकीय विश्रामगृहासाठी साडेतीन ते चार कोटी रुपये उपलब्ध करून देऊनही अद्याप काम सुरू होत नाही. पणदूर घोडगे पूल, बोर्डवे रस्ता, कुंदे रस्ता, आचरा कालावल रस्ता, अणाव- पणदूर पुल अशी अनेक कामे सुरू झालेली नाहीत किंवा अपूर्णावस्थेत आहेत. या कामांबाबत आपण कोणताही आढावा घेतलेला नाही.कुडाळ तालुक्यात नव्वद कोटीची कामे सुरू झालीत. आपल्याकडे २६ कोटी एमडीआर मधून मिळाले पण अजून पंधरा कोटीचीही कामे सुरू झालेली नाहीत. बजेटमधील व एमडीआर मधील किती कामे अपूर्ण व सुरू झालेली नाहीत, याची यादी दाखवा. आम्ही सोमवारी पुन्हा येऊ असे आमदार नाईक म्हणाले. ठेकेदारांची बिल्ड कॅपॅसिटी बघूनच त्यांना कामे द्या. कामे अर्धवट ठेवलेल्या ठेकेदारांना परत परत कशी काय कामे देता? कामे पूर्ण होण्यावर भर द्या, असेही आमदार नाईक यांनी सांगितले.
कार्यालयातील स्वछतागृहाला तीन वर्ष लागतात मग.., आमदार वैभव नाईकांनी बांधकाम विभागाला घेतलं फैलावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 1:38 PM