कणकवली: ‘अच्छे दिन’चे गाजर दाखवूनही महागाईत सातत्याने वाढ होत आहे. याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना १९ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष शैलेश परब, महिला जिल्हाध्यक्ष चैताली भेंडे, सचिव बाळ पावसकर, तात्या पवार, शहरअध्यक्ष शैलेंद्र नेरकर उपस्थित होते. शैलेश भोगले म्हणाले की, महागाईत सातत्याने वाढ होत असून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. सध्या डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. मोदी सरकारने ‘अच्छे दिन’ येतील, महागाई कमी करू अशी आश्वासने दिली होती. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ आहे. राज्यात साठमारीचे प्रमाण वाढले असून राज्य सरकार संबंधितांवर कारवाई करण्यास अपयशी ठरले आहे. राज्यात युतीचे सरकार असून सरकारची वाटचाल शिवशाहीकडून आदिलशाहीकडे होत आहे. डिझेलचे दर वाढले की दूध, एसटी भाडे, रेल्वे भाडेवाढ होते. मात्र, अलिकडे इंधन दरात कपात होऊनही भाडेवाढ कमी झालेली नाही. याविरोधात आंदोलनातून रोष व्यक्त केला जाणार आहे. मनसेचे जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि जनतेने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन धीरज परब यांनी केले. (प्रतिनिधी)
महागाईविरोधात मनसेचे धरणे
By admin | Published: October 18, 2015 12:05 AM