मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वाढणाऱ्या परप्रांतीय हायस्पीड व पर्ससीन अतिक्रमणामुळे सिंधुदुर्गातील छोटा व पारंपरिक मच्छीमार हवालदिल झाला आहे. पारंपरिक मच्छिमारांच्या मासेमारी क्षेत्रात होणारी ही घुसखोरी न थांबल्यास मनसेला कायदा हातात घ्यावा लागेल. मनसैनिकांनी पारंपरिक मच्छिमारांच्या न्याय हक्कासाठी कायदा हातात घेतल्यानंतर पोलिसी कारवाई व गुन्हे दाखल झाल्यास मनसे तयार आहे. परप्रांतीय पर्ससीन ट्रॉलर्सविरोधात मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली ‘खळ-खट्याक’ आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनसे मालवण तालुकाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी दिला आहे. पर्ससीन-हायस्पीड ट्रॉलर्स व पारंपरिक मच्छीमार यांच्यात वादाची ठिणगी भडकण्याची स्थिती मालवण किनारपट्टीवर निर्माण झाली आहे. मत्स्य विभागाचे उदासीन धोरण आणि दिखाऊ कारवाई तसेच शासनाकडून आश्वासनांची केली जाणारी सरबत्तीमुळे मच्छिमारांच्या पदरी निराशाच पडत आहे. काही महिन्यापूर्वी कोकण दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मच्छीमार शिष्टमंडळाने भेटही घेतली होती. त्यावेळी मनसे अध्यक्षांनी परप्रांतीयांविरोधात लढताना मनसे स्थानिक मच्छिमारांच्या पाठीशी ठाम राहील व न्यायही मिळवून देईल असे सांगितले होते. त्यामुळे या परप्रांतीय मच्छिमारांविरोधात मनसे पुढाकार घेऊन लढणार आहे. प्रसंगी कायदा हातात घेवून मनसे स्टाईलने ‘खळ-फट्याक’ आंदोलन छेडले जाईल. त्यासाठी मच्छिमारांसाठी मनसैनिक गुन्हेही अंगावर घेण्यास तयार आहेत, असा इशारा वाईरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)
‘पर्ससीन’विरोधात मनसेचा ‘खळ-फट्याक’चा इशारा
By admin | Published: October 09, 2015 11:02 PM